भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्थेकडून राष्ट्रीय पुरस्कार | शिक्षण अन् पाककलेतील १३ गुणवंतांचा मुंबईत दिमाखदार गौरव.


Digital Gaavkari News

मुंबई : गेल्या २४ वर्षांपासून शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था, मुंबई’च्या वतीने गुरुवार, दि. ३ सप्टेंबर रोजी भव्य राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. दादर (पश्चिम) येथील ‘गुरुकुल सभागृह’ येथे सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत झालेल्या या सोहळ्यात शिक्षण आणि पाककला क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील १३ गुणवंतांचा राष्ट्रीय स्तरावरील विशेष पुरस्कारांनी गौरव करण्यात आला.

यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात पाककलेच्या क्षेत्रात दीर्घकाळ विविध प्रयोग करून या कलेला नवी उंची देणाऱ्या १२ गृहिणींना ‘अन्नपूर्णा रससिद्धी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. तसेच शिक्षण क्षेत्रातील भरीव आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल सौ. रंजना राजेंद्र शिंदे यांना ‘ब्रह्मवादिनी गार्गी राष्ट्रीय शिक्षण सन्मान पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले.



‘अन्नपूर्णा रससिद्धी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६’ प्राप्त मान्यवरांमध्ये सौ. स्वाती सतीश श्रीवर्धनकर, सौ. स्वाती ऐलेश जोशी, सौ. भावना खंडारे, सौ. मनीषा सचिन पाळेकर, सौ. तृप्ती सगुण माणगावकर, सौ. नीता जितेंद्र पाठारे, अरुणा गोपाळ चरपे, सौ. वंदना सुनील भुजाडे, सौ. रत्नप्रभा सुधाकर सानप, सौ. मोहिनी मोहित घरत, सौ. भाविका भरत गोंधळी आणि वैशाली संतोष सुतार यांचा समावेश आहे.

‘ब्रह्मवादिनी गार्गी राष्ट्रीय शिक्षण सन्मान पुरस्कार २०२६’ सौ. रंजना राजेंद्र शिंदे यांना शिक्षण क्षेत्रातील बहुमूल्य कार्याबद्दल प्रदान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानासोबतच पाककलेच्या माध्यमातून पारंपरिक आणि आधुनिक संस्कृती जपण्याचे कार्य करणाऱ्या गुणवंतांच्या योगदानाची दखल घेऊन हे पुरस्कार प्रदान करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या प्रसिद्धी प्रमुखांनी दिली.

सन २००३ पासून मुंबई, पुणे तसेच संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेली ‘भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था’ विविध सामाजिक, शैक्षणिक आणि संशोधनात्मक उपक्रम राबवत आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. आनंद सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण, आरोग्य, योग, निसर्गोपचार, कृषी, देशी गो-संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि साहित्य अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावर सन्मानित केले जाते. तसेच संस्थेमार्फत वैदिक वास्तू, डाऊझिंग आणि विविध वैकल्पिक शास्त्रांचे शासनमान्य प्रशिक्षण दिले जाते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

या पुरस्कार सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. आनंद सर यांच्यासह श्री. शिवपद्म वडाळकर, डॉ. चंद्रमोहन विष्णू रानडे, मा. सौ. सुनीता पाटील, ज्येष्ठ शिक्षिका नंदाताई शिंगरे, हिलर प्रा. भाऊ म्हात्रे, श्री. मनोज वैद्य, हिलर सचिन तावरे, श्री. संदेश कदम, शिक्षिका सौ. भावना खंडारे आणि श्री. आर. विजयसिंह यांचे विशेष सहकार्य लाभले. सोहळ्यास उपस्थित मान्यवरांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या