प्रशासकीय विलंबामुळे Ph.D. (कृषी) विद्यार्थ्यांना STRF-2025 पासून वंचित ठेवू नका; विशेष संधी देण्याची मागणी.


पात्र अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना अर्जाची संधी देण्याची TRTI पुणेकडे मागणी; अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे निवेदन

डिजिटल गावकरी न्यूज
Durgaprasad Gharatkar

नागपूर :  शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मध्ये Ph.D. (कृषी) प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या पात्र अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना STRF-2025 अधिछात्रवृत्तीसाठी अर्ज करण्याची विशेष संधी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, विदर्भ विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीसंदर्भात संघटनेच्या वतीने धनश्री मेघे, स्वीय सहाय्यक आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नागपूर यांच्याकडे निवेदन साद करण्यात आले.यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, विदर्भ विभागाचे विदर्भ सहसचिव साहिल अरविंद मडावी, राहुल मडावी आणि नयन गेडाम हे उपस्थित होते.

प्रवेश प्रक्रियेला झालेल्या विलंबाचा विद्यार्थ्यांना फटका

शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मधील Ph.D. (कृषी) प्रवेश प्रक्रिया डिसेंबर २०२५ पूर्वी पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद (MCAER), पुणे यांच्या प्रवेश प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे अंतिम प्रवेश फेरी ११ मार्च २०२६ रोजी पार पडली.

यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचा प्रवेश आणि नोंदणी ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी पूर्ण होऊ शकली नाही. परिणामी, केवळ नोंदणी निर्धारित मुदतीनंतर झाल्याच्या कारणामुळे अनेक पात्र अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना STRF-2025 अधिछात्रवृत्तीपासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

विद्यार्थ्यांची कोणतीही चूक नसताना कारवाई का?

प्रवेश प्रक्रियेला झालेला विलंब हा विद्यार्थ्यांच्या चुकीमुळे झालेला नसून प्रशासकीय प्रक्रियेतील विलंबामुळे झाला आहे. त्यामुळे या विलंबाचा फटका विद्यार्थ्यांना देणे अन्यायकारक असल्याचे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, विदर्भ विभागाने निवेदनात म्हटले आहे.

संबंधित विद्यार्थ्यांनी प्रथम सत्र पूर्ण करून द्वितीय सत्रात प्रवेश घेतला असून ते शैक्षणिक वर्ष २०२५–२६ चे नियमित Ph.D. (कृषी) विद्यार्थी आहेत. संशोधनाच्या काळात शैक्षणिक शुल्क, संशोधन साहित्य, प्रयोगशाळा, क्षेत्रीय अभ्यास, प्रवास तसेच इतर विविध खर्च मोठ्या प्रमाणात येत असल्याने अधिछात्रवृत्ती विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, विदर्भ विभागाने पुढील मागण्या केल्या आहेत—

- २०२५–२६ मध्ये Ph.D. (कृषी) प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या पात्र अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना STRF-2025 साठी विशेष बाब म्हणून अर्ज करण्याची संधी द्यावी.

- संबंधित विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अर्जाची मुदत उपलब्ध करून द्यावी.

- MCAERच्या प्रवेश प्रक्रियेला झालेला प्रशासकीय विलंब विद्यार्थ्यांच्या विरोधात गृहीत धरू नये.

- पात्र विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी TRTI पुणे आणि आदिवासी विकास विभागाने तातडीने आवश्यक कार्यवाही करावी.

“विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा”

“विद्यार्थ्यांच्या कोणत्याही चुकीमुळे प्रवेश प्रक्रियेला विलंब झालेला नसताना त्यांना अधिछात्रवृत्तीपासून वंचित ठेवणे योग्य नाही. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करून TRTI पुणे आणि शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा,” अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, विदर्भ विभागाच्या वतीने करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या