Digital Gaavkari News
दुर्गाप्रसाद घरतकर
अर्जुनी मोरगाव : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कवठा-बोळदे, परिसरातील प्रसिद्ध कोकणाई माता मंदिरात १५ ऑगस्ट २०२६ रोजी नागरिक व भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पावसाळ्यामुळे परिसरातील डोंगररांगा हिरवाईने नटल्या असून, निसर्गरम्य वातावरणामुळे या ठिकाणी भाविकांसह पर्यटकांचीही मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे.
कोकणाई माता स्थळाला अधिकृत पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा, ही स्थानिक नागरिकांची प्रमुख मागणी आहे. धार्मिक श्रद्धेसोबतच निसर्गसौंदर्याने समृद्ध असलेले हे ठिकाण पर्यटनाच्या दृष्टीने विकसित केल्यास परिसराला मोठी चालना मिळू शकते, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
जुना इतिहास आणि धार्मिक महत्त्व
स्थानिक माहितीनुसार, कोकणाई माता मंदिराचा इतिहास जुना आहे. परिसरातील डोंगरावर देवीच्या मूर्ती व जुन्या अवशेषांचे अस्तित्व आढळून येते. १९९४ मध्ये येथील मूर्ती आणि मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला मंदिर वरती डोंगरावरील भागात असल्यामुळे तिथे जाण्यासाठी कोणताही पक्का रस्ता अजून बनलेला नाही आहे त्यामुळे पर्यटकांना दगडांच्या पायवाटेने वरती जावे लागते.
हा मंदिर भाविकांसाठी २४ तास खुले असते. त्यामुळे विविध भागांतून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात.
पावसाळ्यात निसर्गसौंदर्याला बहर

कोकणाई माता मंदिराचा परिसर डोंगराळ आणि निसर्गरम्य आहे. विशेषतः पावसाळ्यात डोंगरांवर पसरलेली हिरवळ, परिसरातील नैसर्गिक सौंदर्य आणि आल्हाददायक वातावरण यामुळे हे ठिकाण पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनते.
पावसाळ्याच्या दिवसांत या परिसरातील निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक व पर्यटक येथे येतात, अशी स्थानिकांची माहिती आहे. धार्मिक पर्यटनासोबतच निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी या स्थळाचा अधिकृत पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याची मागणी जोर धरत आहे.
पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाल्यास विकासाला चालना
कोकणाई माता मंदिर परिसराला अधिकृत पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाल्यास रस्ते चांगले होतील , पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, पार्किंग, प्रकाश व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधांचा विकास होण्यास मदत होऊ शकते. त्यातून स्थानिक नागरिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यताही आहे.
“कोकणाई माता स्थळाला अधिकृत पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा, ही आमची एकमेव मागणी आहे,” अशी भावना स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
धार्मिक श्रद्धा, ऐतिहासिक महत्त्व आणि पावसाळ्यात खुलून येणारे निसर्गसौंदर्य यामुळे कोकणाई माता मंदिर परिसराला पर्यटनाच्या नकाशावर स्थान मिळावे, यासाठी प्रशासनाने या स्थळाची पाहणी करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

0 टिप्पण्या