स्वातंत्र्यदिनाचा आनंद ठरला काळाचा घाला; चिचगड येथील धासगड वॉटरफॉलमध्ये दोन तरुणांचा बुडून मृत्यू.


डिजिटल गावकरी न्यूज
दुर्गाप्रसाद घरतकर

देवरी गोंदिया:  नमस्कार मंडळी स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी धासगड वॉटरफॉल येथे गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सडक अर्जुनी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट रोजी धासगड वॉटरफॉल येथे पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. परिसरातील तसेच बाहेरगावाहून अनेक पर्यटक पर्यटनासाठी दाखल झाले होते. याचदरम्यान सडक अर्जुनी तालुक्यातील गोटाबोडी गावातून पर्यटनासाठी आलेले दोन तरुण वॉटरफॉलच्या पाण्यात उतरले.

मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. या दुर्घटनेत हेतराम गुलाब सयाम (वय अंदाजे २० ते २१ वर्षे) आणि कृष्णा लखन कापगते (वय अंदाजे २३ ते २४ वर्षे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. दोन्ही तरुण घोपावोडी, ता. सडक अर्जुनी येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

⚠️ पर्यटकांनी काळजी घेण्याचे आवाहन

पावसाळ्यात धबधबे, नदी, नाले आणि तलावांमध्ये पाण्याची पातळी अचानक वाढू शकते. तसेच पाण्याचा प्रवाह आणि खोलीचा अंदाज येत नसल्याने अशा ठिकाणी दुर्घटनेचा धोका मोठा असतो. त्यामुळे फोटो किंवा व्हिडिओसाठी धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे आणि प्रशासनाने प्रतिबंधित केलेल्या भागात अजिबात प्रवेश करू नये. अशा ठिकाणी निष्काळजीपणामुळे जीव गमावण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत.

🙏 पर्यटकांसाठी महत्त्वाचा संदेश


"पिकनिकचा आनंद घ्या, पण जीव धोक्यात घालून नाही.

धबधबा सुंदर आहे, मात्र त्याचा अंदाज न येणारा प्रवाह जीवघेणा ठरू शकतो.

सुरक्षित अंतर ठेवा, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा आणि आपल्या कुटुंबासाठी सुखरूप घरी परत या."

ही घटना प्रत्येक पर्यटकासाठी सावधानतेचा इशारा आहे. एक छोटीशी चूक संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. त्यामुळे पर्यटन करा, आनंद घ्या; पण सुरक्षिततेला नेहमीच पहिला क्रमांक द्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या