रस्त्यावरच केली धानाची रोपाई; म्हसवाणी–डव्वा मार्गाच्या दुरवस्थेविरोधात ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन.


Digital Gaavkari News 

सडक अर्जुनी (गोंदिया): म्हसवाणी–डव्वा मार्गाच्या अत्यंत खराब अवस्थेविरोधात २ ऑगस्ट रोजी ग्रामस्थांनी अनोखे आंदोलन करत रस्त्यावरच धानाची रोपाई केली. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाचा निषेध करण्यासाठी करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.

सन २००५-०६ मध्ये बांधण्यात आलेला हा रस्ता आज पूर्णपणे जीर्ण झाला आहे. पावसाळ्यात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून त्यात पाणी साचते. परिणामी संपूर्ण रस्ता चिखलमय होत असून वाहनचालक, शेतकरी, विद्यार्थी, रुग्ण आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, हा रस्ता शेतीकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग असून अनेक वेळा प्रशासनाकडे दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे. मात्र प्रशासनाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केले. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वार अपघातग्रस्त झाले असून चौचाकी वाहनांचीही वाहतूक धोकादायक बनली आहे.

ग्रामस्थांचा आरोप आहे की, निवडणुकांच्या काळात विकासाची मोठमोठी आश्वासने देणारे लोकप्रतिनिधी आता या रस्त्याकडे पाहायलाही तयार नाहीत. म्हसवाणी–डव्वा मार्ग हा परिसरातील अनेक गावांना जोडणारा प्रमुख संपर्क मार्ग असून त्याची दुरवस्था नागरिकांसाठी जीवघेणी ठरत आहे.

विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होतो, मग या महत्त्वाच्या रस्त्याची दुरुस्ती अनेक वर्षे का रखडली आहे?" असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. प्रशासनाला जाग आणण्यासाठी त्यांनी रस्त्यावर धानाची रोपाई करून निषेध नोंदवला.

ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की, लवकरात लवकर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास रस्ता रोको, जनआक्रोश मोर्चा तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयांसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल.

या आंदोलनात सचिन मोहरले, विजय आंबुले, सत्यजित शेंडे, आशीष राहांगडाले, हीरा शेंडे, भीमराव घरत, विजय रांगडाले, विजय लांजेवार, दुलीचंद कवाडकर, महेंद्र सोनटक्के, आनंदराव मानकर, ईश्वर महुले, हौसलाल गौतम, खुमराज रांगडाले, अंकित पारधी, रूपालाल पारधी, शेषराव बोरकर, अक्षय शेंडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या