कुरखेडा हृदयद्रावक घटना! सती नदीत बुडून तीन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू; एकाचा थरारक बचाव.


गडचिरोली

नमस्कार मंडळी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील राणी खेडेगाव येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सती नदीत आंघोळीसाठी गेलेल्या चार शाळकरी विद्यार्थ्यांपैकी तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर एक विद्यार्थी सुदैवाने बचावला. ही घटना १ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास घडली असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, गावातील अनेक पालक शेतात धान रोपणीच्या कामासाठी गेले होते. त्याचवेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खेडेगाव येथील चार विद्यार्थी जवळील सती नदीवर आंघोळीसाठी गेले. नदीतील पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने तिघे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मृत विद्यार्थ्यांमध्ये लक्ष्मण सुनेर दूतकवर (वय ६ वर्षे), कुणाल रमेश दूतकवर (वय ५ वर्षे) आणि मोहित हिवराज सराटे (वय ११ वर्षे) या तिघांचा समावेश आहे. तर आविष विनोद आमले (वय १२ वर्षे) हा विद्यार्थी सुदैवाने बचावला.

घटनेची माहिती मिळताच शोध पथक तसेच पुराडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पाण्यात बुडालेल्या विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली.

या हृदयद्रावक घटनेमुळे खेडेगाव तसेच संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. निष्पाप चिमुकल्यांच्या अकाली निधनामुळे गावात शोकमय वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी नदी-नाले व जलाशयांच्या परिसरात लहान मुलांवर पालकांनी विशेष लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या