Digital Gaavkari News
Durgaprasad Gharatkar
Delhi: नमस्कार मंडळी डिजिटल गावकरी मध्ये आपले स्वागत आहे आज दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या 20 दिवसांपासून उपोषण करणारे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक यांची प्रकृती खालावल्याने दिल्ली पोलिसांनी त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. या कारवाईनंतर जंतर-मंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आंदोलनस्थळावरील अनेक आंदोलकांना हटविण्यात आले.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वांगचूक यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांची तब्येत चिंताजनक होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी पोलिसांच्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी आरोप केला की, सकाळी पोलिसांनी आंदोलनस्थळी येऊन सोनम वांगचूक यांना जबरदस्तीने ताब्यात घेतले आणि आंदोलनकर्त्यांशी गैरवर्तन केले. तसेच स्वतःवरही पोलिसांनी हल्ला केल्याचा दावा त्यांनी केला. दीपके यांनी केंद्र सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही गंभीर टीका करत देशभर शांततामय आंदोलन करण्याचे आवाहन केले.
यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने सोनम वांगचूक यांच्या आरोग्याबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेची दखल घेत केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारकडून स्पष्टीकरण मागवले होते. न्यायालयाने त्यांच्या जीविताच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असल्याचे नमूद करत तातडीने सुनावणी निश्चित केली होती.
वांगचूक हे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी उपोषण करत होते. नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारांनंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्र्यांनी पद सोडावे, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.
उपोषणादरम्यान वांगचूक यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला होता. त्यांच्या वजनात सुमारे 8.5 किलो घट झाली होती, तर रक्तदाबही कमी झाल्याची माहिती वैद्यकीय अहवालातून समोर आली होती. अनेकांनी त्यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले होते, मात्र त्यांनी आपला निर्णय कायम ठेवला होता.
सोनम वांगचूक यांनी यापूर्वी सांगितले होते की, शरीर अशक्त झाले असले तरी मानसिकदृष्ट्या ते पूर्णपणे खंबीर आहेत आणि आंदोलन शेवटपर्यंत सुरू ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे.
सोनम वांगचूक कोण आहेत?
लडाखचे अभियंता, शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते म्हणून सोनम वांगचूक यांची देशभर ओळख आहे. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी त्यांनी विकसित केलेली 'आइस स्तूप' संकल्पना जगभर प्रसिद्ध झाली. 2018 मध्ये त्यांना प्रतिष्ठेचा रेमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला होता. तसेच 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'थ्री इडियट्स' चित्रपटातील मुख्य पात्राची प्रेरणा त्यांच्यापासून घेतल्याचे मानले जाते.

0 टिप्पण्या