महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार! विदर्भासह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट.


मुंबई | डिजिटल गावकरी न्यूज

नमस्कर मंडळी राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी आता पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गुरुवारपासून राज्यातील अनेक भागांत मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले आहे त्यामुळे जुलैच्या सुरुवातीला कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस झाला होता. मात्र त्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्याने मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांतील शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. अनेक धरणांतील पाणीसाठाही अपेक्षेप्रमाणे वाढलेला नाही.

दरम्यान, वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार असून १६ ते २१ जुलैदरम्यान विदर्भातील काही भागांत पावसाचा अंदाज आहे. विशेषतः १८ आणि १९ जुलै रोजी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

आज या जिल्ह्यांना येलो अलर्ट

हवामान विभागाने आज राज्यातील पुढील भागांसाठी वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

- सिंधुदुर्ग

- कोल्हापूर व घाट विभाग

- सांगली

- सातारा व घाट विभाग

- पुणे व घाट विभाग

- रायगड

- रत्नागिरी

- सोलापूर

- अहिल्यानगर

- बीड

- धाराशिव

- लातूर

- बुलढाणा

- यवतमाळ

- वर्धा

- नागपूर

- भंडारा

- गोंदिया

- चंद्रपूर

- गडचिरोली

या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या