Digital gaavkari News
मुंबई : राज्य सरकारने 36 हजार कोटी रुपयांच्या शेतकरी कर्जमाफी योजनेला मंजुरी दिल्यानंतर 56 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याचा दावा केला आहे. मात्र, प्रत्यक्षात केवळ 17 लाख शेतकऱ्यांचेच संपूर्ण कर्ज माफ होणार असल्याची माहिती समोर आल्याने शेतकरी वर्गात संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सरकारच्या निर्णयानुसार, यापूर्वी कोणतीही कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. मात्र, 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजनेत केवळ 50 हजार रुपयांपर्यंतच लाभ मिळणार आहे. अशा शेतकऱ्यांची संख्या सुमारे 13 लाख असल्याचे सांगितले जात आहे.
याशिवाय, दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाखांवरील संपूर्ण रक्कम स्वतः बँकेत जमा केल्याशिवाय कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, कर्जमाफीच्या अटी आणि शर्तींमुळे अनेक शेतकरी संघटनांनी नाराजी व्यक्त केली असून सरकारने या नियमांचा फेरविचार करावा, अशी मागणी होत आहे.

0 टिप्पण्या