चंद्रपूर हादरलं! तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघाचा भीषण हल्ला; चार महिलांचा मृत्यू, अनेक बेपत्ता असल्याची भीती.


Digital gaavkari News 

Chandrapur Tiger Attack : नमस्कार मंडळी चंद्रपूर जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. Sindewahi तालुक्यातील गुंसेवाही-पवनपार जंगल परिसरात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघाने भीषण हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात आतापर्यंत चार महिलांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून काही महिला अजूनही बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास तब्बल 13 महिला जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी अचानक वाघीण आणि तिच्या पिल्लांनी महिलांवर हल्ला केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीती आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरात एक वाघीण आणि तिची तीन जवळपास एक वर्ष वयाची पिल्लं फिरत असल्याचं सांगितलं जात आहे. आपल्या पिल्लांच्या सुरक्षेसाठी वाघीण अधिक आक्रमक झाली असण्याची शक्यता वनविभागाकडून व्यक्त केली जात आहे. मात्र नेमका हल्ला कशामुळे झाला, महिलांनी नकळत वाघिणीच्या परिसरात प्रवेश केला होता का, याचा तपास सुरू आहे.

घटना अतिशय दुर्गम भागात घडल्याने सुरुवातीला माहिती मिळण्यात अडचणी येत होत्या. वनविभाग आणि पोलीस विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. बेपत्ता महिलांचा शोध घेतला जात असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या घटनेमुळे संपूर्ण Maharashtra हादरलं असून, एकाच वेळी वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाल्याची ही राज्यातीलच नव्हे तर कदाचित देशातील पहिलीच घटना असू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, वनविभागाकडून नागरिकांना जंगल परिसरात न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. विशेषतः तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असं सांगण्यात आलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या