भंडारा : एकाच रात्री २० दुकानांमध्ये चोरी; व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण.


डिजिटल गावकरी न्युज 

भंडारा : नमस्कार मंडळी भंडारा शहरात चोरीच्या घटनांनी डोके वर काढले असून व्यापारी वर्गात मोठी चिंता निर्माण झाली आहे. राजीव गांधी चौक परिसरासह शहरातील विविध भागांमध्ये एकाच रात्री मोठ्या प्रमाणात दुकानफोडीच्या घटना घडल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री १२ ते पहाटे ३ या कालावधीत चोरट्यांनी सुमारे १५ ते २० दुकानांना लक्ष्य केले. यामध्ये भंडारा शहरातील सुमारे १२ दुकाने, शहापूर येथील ३, जवाहरनगर परिसरातील ३ तसेच खरबी भागातील २ ते ३ दुकानांचा समावेश आहे. या सर्व दुकानांतून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि इतर मुद्देमाल चोरीला गेला आहे.

स्थानिक व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, चोरट्यांनी केवळ दोन ते तीन तासांच्या कालावधीत अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही चोरी केली. “आम्ही रात्री उशिरापर्यंत जागून लक्ष ठेवतो, पण चोरट्यांनी नेमकी संधी साधून ही कृत्ये केली,” असे एका व्यापाऱ्याने सांगितले.

पोलिसांकडून रात्री गस्त घातली जाते, असा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी पोलिसांनी रात्रीची गस्त अधिक कडक करावी आणि सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी, अशी मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या