Durgaprasad Gharatkar
चद्रपूर : नमस्कार मंडळी जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुंजेवाही गावाजवळ घडलेल्या घटनेत 63 वर्षीय वच्छला ईश्वर वाडगुरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गावातील काही महिला आणि पुरुष मोहफूल वेचण्यासाठी शेताजवळील जंगल परिसरात गेले होते. याच वेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढवला. वाघाने वच्छला वाडगुरे यांच्यावर झडप घालत त्यांना सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत ओढत नेले आणि ठार केले. ही संपूर्ण घटना त्यांच्या सोबत असलेल्या नागरिकांच्या डोळ्यासमोर घडली.
सोबतीच्या लोकांनी आरडाओरड केल्यामुळे वाघाने मृतदेह सोडून जंगलाच्या दिशेने पलायन केले. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनविभाग आणि पोलिसांना तात्काळ कळविण्यात आले. अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
या घटनेमुळे गुंजेवाही गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, याच परिसरात अवघ्या 15 दिवसांपूर्वी मरेगाव तुकुम येथेही एका व्यक्तीचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप वाढला आहे.
ग्रामस्थांनी वनविभागाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली असून, संबंधित वाघाचा बंदोबस्त करावा, अन्यथा आमरण उपोषण आणि आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. तसेच पीडित कुटुंबाला शासनाकडून तातडीने मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.
वनविभागाने या भागात वाघाचा वावर लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

0 टिप्पण्या