डिजिटल गावकरी न्युज
दुर्गाप्रसाद घरतकर
गोंदिया : Kachargadh Yatra Gondia गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात महाराष्ट्र–मध्यप्रदेश–छत्तीसगड राज्यांच्या सीमेलगत वसलेले कचारगड (कोयली कचारगड) हे आदिवासी समाजाचे पवित्र आराध्य दैवत आहे. येथे ‘महाकाली–कंकाली–कोपरलिंगा’ निमित्ताने दिनांक ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यंदाची कचारगड यात्रा याच कालावधीत पार पडली असून, या यात्रेत लाखो आदिवासी बांधवांनी सहभागी होत आपल्या समृद्ध आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवले.
भारतामध्ये अनेक कृत्रिम व नैसर्गिक स्थळे तसेच पाषाणयुगीन व ताम्रयुगीन गुहा आढळतात; मात्र कोयली कचारगडसारखे नैसर्गिक व पवित्र स्थान देशात अन्यत्र कुठेही नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे. ही भूमी आदिवासींची देवभूमी मानली जाते. येथे मनुष्य व देवत्वाचा साक्षात्कार होतो, अशी मान्यता आहे.
गोंडी आचार्य लिंगोवासी तिरूमाल मोतीरावण कंगाली जी यांच्या अथक परिश्रम, संशोधन व सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आदिवासींच्या या देवभूमीचा शोध लागला. त्यांनी सन १९८४ मध्ये गोंडी सप्तरंगी ध्वज फडकावून कचारगड यात्रेची सुरुवात केली. तेव्हापासून दरवर्षी सलग पाच दिवस ही यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
यंदाच्या यात्रेसाठी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगड तसेच इतर राज्यांतून मोठ्या संख्येने आदिवासी बांधव पारंपरिक वेशभूषेत कचारगड येथे दाखल झाले होते. संपूर्ण परिसरात जिकडे पाहावे तिकडे पिवळ्या रंगाच्या पारंपरिक पोशाखातील भाविकांचे दृश्य पाहायला मिळाले. या यात्रेतून आदिवासी समाजाची ओळख, अस्मिता आणि सांस्कृतिक जाणीव ठळकपणे दिसून आली.
यात्रेदरम्यान भाविकांसाठी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन रात्रीच्या वेळी करण्यात आले होते. तसेच यात्रास्थळी आदिवासींच्या पारंपरिक दागिन्यांची, हस्तकलेची दुकाने, तसेच आदिवासी जीवनशैली व वास्तूशी संबंधित वस्तूंची दुकाने भाविकांचे विशेष आकर्षण ठरली.
यात्रेला आलेल्या आदिवासी बांधवांसाठी जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली होती. भाविकांच्या सोयीसुविधांसाठी प्रशासन, स्वयंसेवी संस्था व स्थानिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने योग्य नियोजन करण्यात आले होते.
कचारगड यात्रेच्या पाच दिवसांत देशभरातील आदिवासी समाजातील राजकीय, सामाजिक, धार्मिक, गैरराजकीय नेते, पंडा-पुजारी, संत-महात्मे, साधू-संन्यासी, नेगी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचे मोठे संमेलन येथे भरले. या काळात गोंडी धर्म, भाषा व संस्कृतीशी संबंधित विचारगोष्ठी, गोंडी नृत्य, गीत-संगीत, कला सादरीकरण, साहित्यिक चर्चा तसेच आदिवासी समाजाशी संबंधित सामाजिक, धार्मिक व राजकीय प्रश्नांवर चिंतन-मंथन करण्यात आले.
कचारगड यात्रा ही जिल्ह्यातील एक महत्त्वाची धार्मिक व सांस्कृतिक परंपरा असून, दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. या यात्रेमुळे आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येते.



0 टिप्पण्या