अर्जुनी/मोरेगाव येथे नवीन तहसील कार्यालयाची प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन उत्साहात संपन्न.

Arjuni morgaon


डिजिटल गावकरी न्युज 
दुर्गाप्रसाद घरतकर.

अर्जुनी/मोरेगाव : देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पावन पर्वावर अर्जुनी/मोरेगाव तालुक्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. गोंदिया जिल्ह्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत पालकमंत्री श्री. इंद्रनील नाईक यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.

अर्जुनी/मोरेगाव तहसील कार्यालयाची विद्यमान इमारत जीर्ण अवस्थेत असल्याने नवीन प्रशासकीय इमारतीची नितांत गरज होती. याबाबत अर्जुनी मोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. राजकुमार बडोले यांनी महसूल विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश येत नवीन इमारतीच्या कामास मंजुरी मिळाली.

या वेळी पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी बोलताना सांगितले की, कोणत्याही तालुक्यासाठी प्रशासकीय इमारत अत्यंत महत्त्वाची असते. सर्व विभागांची कार्यालये एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यास सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात सुविधा मिळतात. ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांचा वेळ व खर्च वाचतो. त्यामुळे निहित कालावधीत सदर प्रशासकीय इमारतीचे काम पूर्ण करण्यासाठी शासन व प्रशासनातील सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करणे गरजेचे आहे.

नवीन प्रशासकीय इमारतीमुळे नागरिकांना अधिक चांगल्या व सुलभ सेवा मिळतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला या भूमिपूजन सोहळ्याला आमदार श्री. राजकुमार बडोले, गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. लायकराम भेंडारकर, अर्जुनी/मोरेगाव नगराध्यक्ष श्रीमती मंजुषा बारसागडे, महिला व बालकल्याण सभापती श्रीमती पौर्णिमा ढेंगे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन प्रशासकीय इमारतीच्या माध्यमातून अर्जुनी/मोरेगाव तालुक्यातील ग्रामीण व शहरी नागरिकांना निश्चितच मोठा लाभ होणार असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या