दुर्गाबाई डोह कुंभली यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाखो भाविकांनी घेतले दुर्गाबाई देवीचे दर्शन.


साकोली | दि. 14 जानेवारी 2026

साकोली: तालुक्यातील कुंभली येथे विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निसर्गरम्य दुर्गाबाई डोह परिसरात मकरसंक्रांतीच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेल्या यात्रेला आज प्रचंड प्रतिसाद लाभला. यात्रेच्या पहिल्याच दिवशी लाखो भाविकांनी दुर्गाबाई देवी व त्यांच्या सात भावांचे दर्शन घेतले.

कुंभलीच्या पूर्वेला असलेल्या दुर्गाबाई डोह परिसरात पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. विदर्भातील नागपूर, गोंदिया, अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आदी जिल्ह्यांतून भाविक मोठ्या श्रद्धेने येथे दाखल झाले. पारंपरिक पवित्र स्नान, देवी दर्शन व नवसपूर्तीसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.

यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासन व महसूल विभाग सज्ज असून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी डोह परिसरात बॅरिकेट्स लावण्यात आले असून आंघोळीस बंदी घालण्यात आली आहे. पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, निवास व्यवस्था आदी सुविधा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

यात्रेनिमित्त गावात मोठी खरेदी-विक्रीची उलाढाल सुरू असून हॉटेल्स, कपडे, जॅकेट, स्वेटर, चपला, खेळणी, लोखंडी अवजारे, दगडी पाट्या, झुले, ब्रेक डान्स, मौत का कुवा यामुळे परिसर फुलून गेला आहे. पारंपरिक हस्तकलेच्या वस्तूंमधून दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो रुपयांची उलाढाल होत आहे..

पूर्वी घोड्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेली ही यात्रा आता सांस्कृतिक, धार्मिक व सामाजिक ऐक्याचे प्रतीक बनली आहे. यात्रेच्या निमित्ताने भजन, पूजन, नाटक, कव्वाली असे विविध धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. तसेच दुर्गाबाई व त्यांच्या सात भावांनी बांधलेली अर्धवट राहिलेली ऐतिहासिक खिंड भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे.

पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने यात्रा प्लास्टिकमुक्त ठेवण्यासाठी स्वयंसेवक व प्रशासनाकडून जनजागृती केली जात आहे.

चार ते पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेत भाविक मोठ्या भक्तिभावाने दुर्गाबाई देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेत असून, सामाजिक समरसता व निसर्गसौंदर्याचे अद्वितीय दर्शन घडत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या