नागपूर – चंद्रपूर प्रवास लवकरच दोन तासांत होणार पार ; नवीन संरेखनाला पर्यावरणीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर..


नागपूर | प्रतिनिधी

नागपूर–मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार चंद्रपूरपर्यंत करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले असून, नागपूर–चंद्रपूर द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे. या महामार्गाच्या संरेखनात बदल करण्यात आला असून, सुधारित संरेखनाला राज्य सरकारची मान्यता मिळाल्यानंतर आता पर्यावरणीय मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडे दोन दिवसांपूर्वी हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर भूसंपादन प्रक्रिया आणि निविदा प्रक्रिया पूर्ण करून महामार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे.

वन क्षेत्र वाचवण्यासाठी संरेखनात बदल

या महामार्गाच्या मूळ संरेखनामुळे मोठ्या प्रमाणावर वन क्षेत्र बाधित होत होते. त्यामुळे पर्यावरणीय मान्यता मिळालेली असतानाही वन क्षेत्र वाचवण्यासाठी संरेखनात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. नवीन सुधारित संरेखनानुसार सुमारे २७ हेक्टर वन क्षेत्र बाधित होण्यापासून वाचवण्यात यश आले आहे, हे विशेष मानले जात आहे.

२०४ किमी लांबीचा चार पदरी महामार्ग

नवीन संरेखनानुसार हा महामार्ग चार पदरी असून एकूण लांबी २०४ किलोमीटर आहे. काही दिवसांपूर्वी या सुधारित संरेखनाला राज्य सरकारची अधिकृत मान्यता मिळाली आहे.

पूर्वीच्या निविदा रद्द

या प्रकल्पासाठी एमएसआरडीसीने सहा टप्प्यांत निविदा मागविल्या होत्या आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळाला होता. मात्र, भूसंपादन प्रक्रिया पूर्ण नसताना निविदा काढण्यात आल्याने त्या निविदा रद्द करण्यात आल्या. आता नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

प्रवासाचा वेळ लक्षणीय कमी होणार

सध्या नागपूर ते चंद्रपूर प्रवासासाठी तीन ते साडेतीन तासांचा कालावधी लागतो. मात्र, हा द्रुतगती महामार्ग सेवेत दाखल झाल्यानंतर हे अंतर फक्त दोन तासांत पार करता येणार असल्याने विदर्भातील दळणवळण अधिक वेगवान होणार आहे.

दरम्यान, नागपूर–चंद्रपूरसह नागपूर–गोंदिया, भंडारा–गडचिरोली आणि जालना–नांदेड अशा महामार्गांच्या माध्यमातून समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या