गोंदिया जिल्ह्यातील शासकीय धान खरेदी केंद्रांमध्ये कोट्यवधींचा घोटाळा ₹1 कोटी 13 लाख 86 हजार शासकीय निधीचा अपहार उघड.


गोंदिया: नमस्कार मंडळी शेतकऱ्यांच्या कष्टाची कमाई आणि गरीबांच्या अन्नसुरक्षेसाठी स्थापन करण्यात आलेली गोंदिया जिल्ह्यातील शासकीय धान खरेदी केंद्रे आज भ्रष्टाचार, फसवणूक आणि संघटित लुटीचे अड्डे बनल्याचे चित्र समोर आले आहे. खरीप विपणन हंगाम 2024–25 दरम्यान जिल्ह्यातील तीन सहकारी संस्थांनी मिळून तब्बल ₹1 कोटी 13 लाख 86 हजार शासकीय निधीचा उघड अपहार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

बनावट नोंदणी, कागदी शेतकरी आणि संगनमत

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, धान खरेदी केंद्रांमध्ये बनावट घट, खोट्या नोंदण्या आणि कागदी शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक संघटित नेटवर्क उभे करण्यात आले होते. या नेटवर्कमध्ये धान खरेदी, शासकीय बोनस, सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्य आणि एफसीआय यांना एकमेकांशी जोडून सुमारे 60 घाटांची मजबूत साखळी तयार करण्यात आली होती.
यामध्ये खरा शेतकरी रांगेत उभा राहिला, तर कागदावर असलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर पैसे उचलले गेले आणि गरीबांच्या हक्काचे रेशन व्यवस्थेतून गायब होत राहिले. हा प्रकार केवळ आर्थिक घोटाळा नसून, गरीबांच्या ताटावर केलेला थेट आघात आहे.

तीन केंद्रे – एकच पॅटर्न, एकच लूट

चौकशीत स्पष्ट झाले आहे की जिल्ह्यातील तीनही धान खरेदी केंद्रांमध्ये एकसारखीच पद्धत, एकसारखीच कार्यशैली आणि एकसारखीच लूट करण्यात आली.

रामा टोला (पौलदोना) केंद्र
मानव क्षेत्रीय बहुउद्देशीय कुशी सहकारी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांनी संगनमताने ₹63,75,200 इतक्या बोनस रकमेचा अपहार केला.

कोटजंबोरा केंद्र
सालेकसा सहकारी भात गिरणी संस्थेतील चार महिला संचालकांसह संपूर्ण संचालक मंडळाने ₹19,55,200 ची बेकायदेशीर उचल केली.

गिरोला केंद्र
कावेरी क्षेत्र साधन सामग्री संस्थेतही ₹19,55,200 इतका शासकीय निधी गायब झाल्याचे निष्पन्न झाले.

कागदांवर श्रीमंती, प्रत्यक्षात शेतकरी बेहाल

या खरेदी केंद्रांचे संचालक शेतकऱ्यांच्या नावावर श्रीमंत होत गेले, शासकीय बोनसवर ऐश करत राहिले; मात्र खरा धान उत्पादक शेतकरी आजही आपल्या हक्कासाठी वणवण भटकताना दिसत आहे.

28 आरोपींवर गुन्हा दाखल

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे निरीक्षण अधिकारी सतीश मदन डोंगरे यांच्या अहवालाच्या आधारे गुन्हा क्रमांक 593/25 अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या गंभीर कलमान्वये 28 आरोपींविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. सध्या सर्व आरोपी पोलीस तपासाच्या कक्षेत आहेत.

प्रश्न अद्याप कायम

गरीबांच्या रेशन चोरीचे सर्व थर उघड होणार का?

एफसीआय आणि धान खरेदी केंद्रांमधील मिलीभगत समोर येणार का?

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शेतकऱ्यांना त्यांचा हिरावलेला हक्क परत मिळणार का अशा प्रश्न आता शेतकरी विचारू लागले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या