संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर शिर्के बंधूंना अखेर वतन मिळालं का? औरंगजेबाने त्यांच्यासोबत काय केलें जाणुन घ्या ?


Digital Gaavkari News
Durgaprasad Gharatkar

Chhaava Shirke History : नमस्कार मित्रांनो, छावा चित्रपटानं अख्ख्या महाराष्ट्रालाच काय तर संपूर्ण भारताला भुरळ घातली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा आणि मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या पडद्यावर पाहायला मिळतोय. चित्रपटगृहातली अनेक दृश्यं बघितली तर लोक थिएटरमध्ये बसून अक्षरशः रडतायत. डोळ्यात पाणी न येता एकही माणूस थिएटरमधून बाहेर पडत नाहीये. मोठ्या माणसांचा सोडून द्या, लहान लहान मुलं देखील हमसून हमसून रडतायत. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान पाहून काय ते तेज, काय तो पराक्रम, काय ते मृत्युंजयी जीवन! फक्त स्तिमित करून टाकणार आहे एवढं नक्की.

हे संभाजी महाराजांचे चरित्र पण चित्रपट पाहणाऱ्या अनेक लोकांना आता इतिहासातले प्रश्न देखील पडायला लागलेत. संभाजी महाराजांशी आणि एक प्रकारे महाराष्ट्राशी विश्वासघात करणाऱ्या शिरके बंधूंचं पुढे काय झालं? असा प्रश्न अनेक लोकांना पडलाय आणि ते लोक आम्हाला आता विचारतायत. या प्रश्नाचं उत्तर इंटरनेटवर तुकड्यांमध्ये मिळतं, पण आजच्या या लेखामध्ये तुम्हाला संपूर्ण आणि सविस्तर तो इतिहास सांगणार आहे. नेहमीप्रमाणेच, तो काही लोकांना आवडणार आणि काहींना नाही. लोकांचं त्यावर वेगळं मत असू शकतं, पण आज या दगाबाजीचा इतिहास सगळ्यांच्या समोर मांडणं गरजेचं आहे.


तर चला पाहूया, या शिरके बंधूंचं पुढं काय झालं. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या शिरकेंचं आणि संभाजी महाराजांचं किंवा शिवाजी महाराजांचं नातं कसं होतं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहा मुली होत्या. या सहा मुलींमध्ये राजकुमारबाई नावाच्या मुलीचं लग्न महाराजांनी दाभोळच्या पिलाजीराव शिरके यांच्या मुलाशी, म्हणजे गणोजी शिरके यांच्याशी लावलं होतं.

पिलाजीराव शिरक्यांना आपल्या स्वतःसाठी दाभोळचं वतन पाहिजे होतं. पण शिवाजी महाराजांच्या राज्यात अशा प्रकारचं वतन देण्याची पद्धत नव्हती. महाराजांनी राजकुमारबाईला मूल झाल्यानंतर वतनाचं बघून घेऊ असं सांगून वेळ मारून नेली. पुढे युवराज शाहू महाराजांच्या एका पत्रात, छत्रपती शिवरायांनी म्हणजे शाहू महाराजांच्या आजोबांनी, अशा प्रकारचा शब्द दिला होता असं शाहू महाराजांनी स्वतः म्हटलं. अर्थात, संभाजी महाराजांच्या लग्नाची ही घटना 1660 च्या दरम्यानची असेल.

आता पुढे, जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी महाराणी सोयराबाई, अनाजीपंत आणि मोरोपंत यांच्या विरोधात उघडपणे संपूर्ण राज्य आपल्या ताब्यात घेतलं, त्यावेळी पिलाजीराव शिरके यांनी आपल्या पुत्रांसह, म्हणजे गणोजी शिरके आणि इतर परिवारासह, संभाजी महाराजांना मदत केली होती. त्यानंतर 1682 मध्ये राज्य स्थिर झाल्यावर, हे शिरके मंडळी महाराजांकडे दाभोळचं वतन मागू लागली. ही गोष्ट आपण चित्रपटात देखील बघितली असेल.

हा वतनासाठीचा हट्ट तसाच राहिला, पण 1682 सालीच गणोजी शिरके आणि कान्होजी शिरके यांच्यापैकी कान्होजी मोगलांना सामील झाले. पण गणोजी अजूनही संभाजी महाराजांच्याच बाजूने होते. पण अर्थातच, या दोघांचं नातं पाहता गणोजी शिरके कोणत्या कारणासाठी संभाजी महाराजांकडे थांबले असतील याचा अंदाज येतो. चिटणीस बखरीत आलेल्या माहितीनुसार, संभाजी महाराजांना हटवून त्यांच्या जागी लहान असलेल्या युवराज शाहूंना बसवायचं कारस्थान गणोजी आणि कान्होजी शिरके करत होते. हे संभाजी महाराजांना कळल्यावर, महाराजांनी शिरक्यांवर हल्ला करून त्यांचं 'शिरकाण' केलं. यात शिरके परिवारातील अनेक लोक मारले गेले, त्यांची घरं जाळली गेली.


यामुळे शिरके आणि कवी कलश यांच्यात उघड वाद सुरू झाला. संभाजी महाराजांनी कवी कलश यांची बाजू घेतली, त्यामुळे शिरके उघडपणे मोगलांना सामील झाले आणि त्यांनी संभाजी महाराजांवर राग धरला. जयधे शकावलीतल्या नोंदीनुसार, 1610 शकेमध्ये कवी कलश यांच्यावरील शिरक्यांचा रोष वाढला. पुढे गणोजी आणि कान्होजी यांनी उघडपणे संभाजी महाराजांच्या विरोधात जाऊन मोगलांना आंबाघाटाची वाट दाखवली आणि खानाला संगमेश्वरच्या महाराजांच्या वाड्यापर्यंत पोहोचवलं.

संभाजी महाराज त्यानंतर कैदेत पडले. पुढे, औरंगजेबाने त्यांची हत्या केली आणि गणोजी व कान्होजी शिरक्यांना मोगलांकडून पाच हजारी मनसबदारी मिळाली. पुढच्या संपूर्ण काळात अनेक लोक अनेक गोष्टी सांगत असले तरी, हा शिरके परिवार संपूर्ण स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात शेवटपर्यंत मोगलांच्याच बाजूने होता.

डिसेंबर 1697 मध्ये जुल्फिकार खानाने राजाराम महाराजांना दक्षिणेतील जिंजीच्या किल्ल्यावर जबरदस्त कोंडीत पकडलं होतं. त्यावेळी जुल्फिकार खानाच्या सैन्यात गणोजी शिरके स्वतः होते. पुढे मार्च 1701 च्या मुघल दरबाराच्या एका बातमीपत्रात, कान्होजी आणि गणोजी शिरक्यांनी औरंगजेबाची भेट घेतल्याचा उल्लेख आहे. औरंगजेबाने त्यांच्या मनसबदारीत वाढ देखील केली.

या गणोजी शिरक्यांचा इतिहास 1701 नंतर मात्र कुठेही आढळत नाही. त्यामुळे कदाचित त्या काळानंतर त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला असावा. पुढे, मराठ्यांचं स्वातंत्र्ययुद्ध संपलं, मराठे विजयी झाले, औरंगजेब मेला आणि महाराष्ट्रात शाहू महाराजांचं राज्य स्थिर झालं. तेव्हा शिरके घराणं पुन्हा मराठ्यांच्या बाजूने आलं आणि त्यांनी पुन्हा आपल्याला पाहिजे तसं वतन शाहू महाराजांकडून करून घेतलं.

हा खरा शिरके घराण्याचा इतिहास आहे आणि तो आपण बदलू शकत नाही. कान्होजी आणि गणोजी शिरके शेवटपर्यंत मोगलांच्या बाजूनेच राहिले आणि याबद्दल त्यांना कोणत्याही प्रकारचा पश्चात्ताप शेवटपर्यंत झाला नाही.

हा लेख तुम्हाला कसा वाटला? काही नवीन माहिती मिळाली असेल, तर कमेंट करून आम्हाला जरूर कळवा!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या