लाखनीत व्हाईस ऑफ मिडीयातर्फे 'पत्रकार दिन' साजरा.


लाखनीत व्हाईस ऑफ मिडीयातर्फे 'पत्रकार दिन' साजरा

नरेंद्र मेश्राम

भंडारा :- लाखनी येथील विश्रामभवन येथे पञकार दिनाचा कार्यक्रम दि .6 जानेवारीला घेण्यात आला .पत्रकारीता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकार हा आपल्या जीविची पर्वा न करता सद्विवेकबुद्धीचा वापर करून जनकल्याणार्थ अहोरात्र झटत असतो.जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्याचे निराकरण करण्यासाठी शासन-प्रशासनला प्रवृत्त करतो. समाजाला जागृत करून जगण्याच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या पत्रकाराच्या त्याग व समर्पणाप्रती सन्मानार्थ दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस हा " पत्रकार दिन " म्हणून साजरा केला जातो.


दि.६ जानेवारी रोजी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून लाखनी येथील विश्रामगृहात तालुक्यातील सर्व स्थानिक पत्रकार व तालुका प्रतिनिधींच्या उपस्थितीत " पत्रकार दिन " साजरा करण्यात आला. यावेळी लाखनी येथीक तहसीलदार धनंजय देशमुख, पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव, तसेच गडविकास अधिकारी नेताजी धारगावे प्रमुख पाहुणे होते. यावेळी मुरमाडी ग्रामपंचायतचे सरपंच शेषराव वंजारी आणि व्हाईस ऑफ मिडीया पत्रकार संघांचे लाखनी तालुकाध्यक्ष कल्याण राऊत, शमीम आकबानी, कालिदास खोब्रागडे, अतुल नागदेवे, राजू खान, श्यामसुंदर उके, अजिंक्य भांडाराकर हजर होते.

दरम्यान, अध्यक्षस्थानी असलेल्या तहसीलदार देशमुख
यांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला दीपप्रज्वलन करून माल्यार्पण करण्यात आले. सर्व मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषन राऊत यांनी सादर केले. यावेळी रक्तदाते दिनेश पंचबुद्धे व जयेंद्र देशपांडे यांचेसह ड्रोन पायलट भावना भेलावे यांचेसह वृत्तपत्र वितरक व वर्तमानपत्र वाटप करणाऱ्या मुलांचा सत्कार करण्यात आला.

तहसीलदार धनंजय देशमुख यांचेहस्ते २९ वेळा रक्तदान करणारे दिनेश पंचबुद्धे, २६ वेळा रक्तदान करणारे रुग्णसेवक तथा रक्तवीर जयेंद्र देशपांडे तसेच ड्रोन पायलट भावना भेलावे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच वृत्तपत्र वितरक अशोक धरमसारे, दामू वंजारी, थोटे व वृत्तपत्र वाटप करणाऱ्या मुलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांनी कार्यक्रमाच्या उपस्थीत सर्व पत्रकारांना नववर्षाच्या व पत्रकारदिनाच्या शुभेच्छा देत तळागाळातील माणसाच्या न्यायहक्कासाठी लढण्याचे व निर्भिड राहून संविधानाचे रक्षण करण्याचे आवाहन केले.तर, मुरमाडी/सावरी ग्रामपंचायत सरपंच शेषराव वंजारी यांनी सर्व पत्रकार मंडळींना दैनंदीनी भेट देत नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या तसेच पत्रकारांच्या कार्यक्षमतेचे व जनसेवेच्या भावनेचे तोंडभरून कौतुकही केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजिंक्य भांडारकर यांनी केले तर आभार कल्याण राऊत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अतुल नागदेवे , शमीम आकबानी, कालिदास खोब्रागडे, अनिल शेंडे, शामसुंदर उके, राजू पाशाभाई, मदन कमाने, शैलेश उरकुडे, खुशाल भुरे, नरेंद्र मेश्राम ,मिथिलेश गिरेपुंजे इत्यादी पत्रकार उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या