डिजिटल गावकरी न्यूज
गोंदिया : नमस्कार मंडळी दारूच्या नशेत आणि धान विक्रीच्या पैशांवरून झालेल्या वादातून पतीने स्वतःच्या पत्नीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
मृत महिलेचे नाव रामकला शिवणकर (वय अंदाजे ४४ वर्षे) असे आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या मुलगा रोहन याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी जागेश्वर शिवणकर याला दारूचे व्यसन होते. तो नेहमी दारू पिऊन पत्नीशी वाद घालत असे तसेच तिला मारहाणही करत असल्याची माहिती समोर आली आहे.
२३ नोव्हेंबर रोजी कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत घरी तुळशी विवाह सोहळा पार पडला. नातेवाईक निघून गेल्यानंतर जागेश्वर याने दारूचे सेवन केले आणि धान विक्रीच्या पैशांवरून पत्नी रामकला यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या मुलगा रोहन यालाही त्याने शिवीगाळ करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, लहान मुलाने मध्यस्थी करत वाद शांत केला.
रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पती-पत्नी झोपण्यासाठी खोलीत गेले. घरातील इतरांना आवाज ऐकू येऊ नये म्हणून आरोपीने टीव्हीचा आवाज मोठा ठेवला. त्यानंतर रात्रीच्या सुमारास पुन्हा दारूचे सेवन करून खोलीचा दरवाजा आतून बंद केला.
२४ नोव्हेंबर रोजी सकाळी नळाला पाणी आल्याने नातेवाईकांनी पाणी भरण्यासाठी रामकला यांना उठवण्याकरिता खोलीचा दरवाजा ठोठावला. मात्र, आरोपी जागेश्वर याने दरवाजा उघडला आणि काहीही न बोलता शेताच्या दिशेने पळ काढला.
यानंतर मुलांनी खोलीत जाऊन पाहिले असता रामकला शिवणकर या रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांच्या जवळच रक्ताने माखलेली कुऱ्हाडही आढळली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील आणि डुग्गीपार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. फरार झालेल्या आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे चिखली परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

0 टिप्पण्या