नात्याला काळीमा! लग्नाचा हट्ट फेल… दीराने वहिनीची मध्यरात्री हत्या.



भंडारा : जिल्ह्यातील एका धक्कादायक आणि मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटनेने संपूर्ण विदर्भ हादरून गेला आहे. दीर–वहिनीच्या नात्याला आई–मुलाच्या नात्याइतकी पवित्र मान्यता असताना, त्याच नात्यातून उगवलेल्या विकृत विचारांनी एका निरपराध महिलेचा जीव घेतला.

भंडारा जिल्हा मधील लाखांदूर तालुक्यात ही भीषण घटना घडली. 32 वर्षीय माधुरी तुळसीदास अंबादे यांची त्यांच्या सख्ख्या दीराने मध्यरात्री झोपेत गळा चिरून हत्या केली. या घटनेने केवळ लाखांदूरच नव्हे तर संपूर्ण विदर्भात संताप आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

या प्रकरणाला अधिक हृदयद्रावक बनवणारी गोष्ट म्हणजे ही हत्या माधुरी यांच्या आठ वर्षांच्या चिमुकल्या मुलीसमोरच घडली. आईचा असा क्रूर अंत पाहण्याचा धक्का त्या निष्पाप मुलीला आयुष्यभर विसरता येणार नाही.

माधुरी अंबादे या मूळच्या ब्रह्मपुरी येथील रहिवासी होत्या. त्यांचा विवाह तुळसीदास अंबादे यांच्याशी झाला होता. मात्र काही कौटुंबिक कारणांमुळे घरातील वातावरण बिघडले होते. याच दरम्यान, आरोपी गौरव अंबादे (वय 25) — जो माधुरी यांचा सख्खा दीर आहे — तो गेल्या काही काळापासून त्यांच्यावर लग्नासाठी दबाव टाकत असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.


घटनेच्या दिवशी, एका नातेवाईकाच्या लग्नासाठी माधुरी, त्यांची मुलगी जानवी आणि गौरव हे तिघेही पालांदूर येथे आले होते. याच ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास, लग्नाचा हट्ट पूर्ण न झाल्याच्या रागातून गौरवने हे टोकाचे पाऊल उचलत, माधुरी यांची निर्दयी हत्या केली.

या घटनेमुळे एका सुखी कुटुंबाचा पूर्णतः विनाश झाला असून, समाजात नात्यांच्या पवित्रतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या