चंद्रपूर काँग्रेसमध्ये उघड फूट; ठाकरे गट–वंचित युतीमुळे सत्तास्थापनेचा पेच अधिक गडद धनोरकरांनी 13 नगरसेवकांचा गट केला स्थापन.


चंद्रपूर | प्रतिनिधी

चंद्रपूर महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत असून काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता उघडपणे समोर आला आहे. काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धनोरकर यांनी आपल्या समर्थक 13 नगरसेवकांसह नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात स्वतंत्र गटाची नोंदणी केल्याने काँग्रेसमधील फूट अधिकृतपणे समोर आली आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसचे एकूण 27 नगरसेवक निवडून आले असून, त्यापैकी प्रतिभा धनोरकर गटाचे 13 तर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार गटाचे 14 नगरसेवक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद आता संघटनात्मक पातळीवर पोहोचल्याचे चित्र आहे.

वाद मिटल्याचे दावे हवेतच

काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मध्यस्थीनंतर धनोरकर–वडेट्टीवार यांच्यातील वाद मिटल्याचे सांगितले जात होते. मात्र, गटनोंदणीच्या या घडामोडीमुळे हा वाद प्रत्यक्षात अद्यापही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

खासदार प्रतिभा धनोरकर यांनी यापूर्वी लोकसभा मतदारसंघात इतरांनी लुडबूड करू नये, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर विजय वडेट्टीवार यांनी जाहीर प्रत्युत्तर दिल्यानंतर हा संघर्ष अधिक चिघळला. आता या वादात दोन्ही नेत्यांचे समर्थकही उघडपणे मैदानात उतरल्याचे चित्र आहे.

ठाकरे गट–वंचित बहुजन आघाडीची युती; नवा गट नोंदणीकृत

दरम्यान, चंद्रपूरच्या सत्तासमीकरणाला आणखी कलाटणी देत शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांनी एकत्र येत नवीन गटाची अधिकृत नोंदणी केली आहे. नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात ही नोंदणी करण्यात आली.

या नव्या आघाडीत

ठाकरे गटाचे 6 नगरसेवक

वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक

असे एकूण 8 नगरसेवक एकत्र आले आहेत.

‘महापौरपद देणाऱ्यालाच पाठिंबा’ – ठाकरे गटाची थेट भूमिका

“जो पक्ष आम्हाला महापौरपद देईल, त्यालाच आम्ही पाठिंबा देऊ,” अशी स्पष्ट भूमिका ठाकरे गटाने घेतल्याने चंद्रपूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी किंगमेकरच्या भूमिकेत येण्याची शक्यता बळावली आहे.

सत्तास्थापनेचा तिढा कायम

चंद्रपूर महानगरपालिकेत सध्या कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही.

काँग्रेस + पुरस्कृत नगरसेवक : 30

सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला अजून 4 नगरसेवकांची गरज

भाजप : 23 नगरसेवक, सत्तास्थापनेसाठी चाचपणी सुरू

काँग्रेसमधील फूट, ठाकरे गट–वंचित युती आणि भाजपची हालचाल यामुळे चंद्रपूरची सत्ता कोणाच्या हाती जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

पुढे काय?

आगामी काही दिवसांत होणाऱ्या घडामोडी चंद्रपूरच्या सत्तेचे चित्र स्पष्ट करतील. मात्र, सध्या तरी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आणि नव्या राजकीय युतीमुळे चंद्रपूरचे राजकारण चांगलेच तापले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या