खजरी शेतशिवार खून प्रकरण उलगडले; महिलेचा खून करून बाळाची विक्री करणाऱ्या 7 आरोपिंना केले जेरबंद....


सडक अर्जुनी (गोंदिया)

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी शेतशिवारात आढळलेल्या अनोळखी महिलेच्या खुनाचा अखेर उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. आईचा खून करून तिच्या सात महिन्याच्या बाळाची विक्री करणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे. या कारवाईनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

प्रकरणाची सुरुवात

3 ऑगस्ट 2025 रोजी खजरी शेतशिवारात एका अंदाजे 20 ते 25 वर्षांच्या अनोळखी महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळला होता. प्राथमिक अंदाजानुसार महिलेचा खून करून मृतदेह टाकण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ माजली होती.

मृतक महिलेची ओळख पटली

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी सतत तपास सुरू ठेवत गुप्त माहितीच्या आधारे मृतक महिलेची ओळख पटवली. ती छत्तीसगडमधील भिलाई येथील अनु नरेश ठाकूर (वय 21) असल्याचे निष्पन्न झाले.

आरोपींचा शोध आणि कबुलीजबाब

तपासात आरोपी अभिषेक सिद्धार्थ तुरकर (वय 36, राहणार भिलाई, सध्या डोंगरूटोला, गोरेगाव) याचे नाव समोर आले. त्याला 22 ऑगस्ट रोजी डोंगरूटोला येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने कबुली दिली की, त्याचे अनु ठाकूरसोबत अनैतिक संबंध होते. तो प्रचंड कर्जबाजारी झाल्यामुळे पैसे मिळवण्यासाठी त्याने आपल्या पत्नी पूनम, बहीण चांदनी आणि नातेवाईक प्रिया तुरकर यांच्यासह कट रचला.

2 ऑगस्ट रोजी अभिषेक तुरकरने अनु ठाकूर हिला भिलाईहून मोटरसायकलवरून खजरी शेतशिवारात आणले. तेथे चाकूने वार करून तिचा खून केला.

सात महिन्याच्या बाळाची विक्री

खुनानंतर आरोपींनी अनु ठाकूरच्या सात महिन्याच्या मुलगा धनराज याचे बनावट जन्म प्रमाणपत्र तयार केले. नंतर या बालकाची विक्री पैसे मिळवण्यासाठी करण्यात आली. तपासात सुरेखा रमेश चव्हाण (गड्डाटोली, गोंदिया), प्रीती विकास कडबे (कस्तूरबा वाडा, कचरा मोहल्ला, गोंदिया), भावेश अशोक बणसोड (मनोहर कॉलनी, रामनगर, गोंदिया), कमल सुखलाल यादव (गड्डाटोली, गोंदिया) या चार जणांनी बालकाची खरेदी केली असल्याचे उघड झाले.

सात आरोपी जेरबंद

या गुन्ह्यातील एकूण सात आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना डुग्गीपार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

गोंदिया पोलिसांची महत्त्वपूर्ण कारवाई

ही कारवाई गोंदिया पोलीस अधीक्षक गोरख भामरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम ऐरकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

या तपासामुळे परिसरातील नागरिकांच्या मनातील खुनाबाबतची शंका दूर झाली असून पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या