गोंदिया जिल्ह्यातील डव्वा/स. ग्रामपंचायत ठरली एक कोटी पुरस्काराची मानकरी.



राष्ट्रीय पंचायत पुरस्कार - देशातून प्रथम

Digital Gaavkari
दुर्गाप्रसाद घरतकर

गोंदिया, 20 एप्रिल 2025: गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा/स ग्रामपंचायतीने राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2023-24 अंतर्गत भारतातून प्रथम पुरस्कार पटकावला आहे. हवामान बदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल या ग्रामपंचायतीला *क्लायमेट ऍक्शन स्पेशल पंचायत अवॉर्ड* मिळाला असून, यासह एक कोटी रुपयांचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. कर्नाटकच्या बिरडाहल्ली ग्रामपंचायतीने द्वितीय, तर बिहारच्या मोतीपूर ग्रामपंचायतीने तृतीय पुरस्कार मिळवला. हा पुरस्कार 20 एप्रिल रोजी शासनाने जाहीर केला.

डव्वा/स ग्रामपंचायतीच्या सरपंच योगेश्वरी चौधरी आणि ग्रामपंचायत अधिकारी सिंधू सूर्यवंशी यांनी सांगितले की, वाढत्या प्रदूषणामुळे तापमानात होणारी वाढ मानवी जीवन आणि पिकांवर परिणाम करत आहे. यावर उपाय म्हणून ग्रामपंचायतीने सौर ऊर्जेचा वापर, प्लास्टिक बंदी, फटाके बंदी यांसारख्या उपाययोजना राबवल्या. "निसर्गाच्या पंचतत्त्वांसह जीवनशैली अंगीकारल्याशिवाय आपण निसर्गासोबत जगू शकत नाही आणि जैवविविधतेचे अस्तित्वही टिकणार नाही," असे त्यांनी नमूद केले.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम एम., आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. एम. वासनिक यांनी ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले. मुरुगानंथम यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत, सर्व सदस्य आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने हा पुरस्कार मिळवण्यासाठी अथक परिश्रम घेण्यात आले. 11 एप्रिल रोजी दिल्लीच्या पथकाने, ज्यात श्रीमती अनुराधा आणि श्रीमती नीलिमा गोएल यांचा समावेश होता, ग्रामपंचायतीची पाहणी केली.

या यशात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम, उपाध्यक्ष सुरेश हर्षे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासनिक, सडक अर्जुनी पंचायत समितीचे सभापती चेतन वडगाये, उपसभापती निशाताई काशिवार, गट विकास अधिकारी रविकांत सानप, विस्तार अधिकारी रवींद्र पराते, उपसरपंच सुनील घासले, ग्रामपंचायत सदस्य आणि गावकऱ्यांचा मोलाचा वाटा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या