डिजिटल गावकरी न्युज
सडक अर्जुनी : सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम माहुली येथील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवार, ३० जानेवारी रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. लक्ष्मीबाई हेमराज ससाणे (वय ५५, रा. माहुली) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी वर्गात प्रचंड दहशत पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार, लक्ष्मीबाई ससाणे या नेहमीप्रमाणे शेतात काम करत होत्या. याच वेळी झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक मागून झडप घालत त्यांच्यावर हल्ला केला. या अचानक झालेल्या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या व त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच शेजारील शेतकरी, मजूर व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेमुळे माहुली परिसरात भीतीचे व शोककळेचे वातावरण पसरले आहे. शांत व कष्टकरी महिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लक्ष्मीबाई यांच्या दुर्दैवी मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, मानवी जीव धोक्यात येत असताना वनविभागाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
परिसरात वाघाचा मुक्त संचार वाढल्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे तात्काळ पिंजरा लावून वाघाला जेरबंद करावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

0 टिप्पण्या