Digital Gaavkari
Durgaprasad Gharatkar
Jalna Crime News : मंडळी मागच्या काही काळापासून जालना जिल्हा वेगवेगळ्या कारणांनी महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर जालना सातत्याने बातम्यांमध्ये आहे. सध्या अवैध वाळू तस्करीमुळे जालनाला विळखा पडला आहे. रोज पोलीस वाळू माफियांच्या मागावर आहेत. गेल्या महिन्यात 15 जणांवर गुन्हा दाखल झाला होता आणि त्यांच्याकडून 100 ब्रास वाळू जप्त करण्यात आली होती. तरीही हा वाळू उपसा थांबायचं नाव घेत नाही.
काल वाळू तस्करी करणाऱ्या माफियांचा पाठलाग करत असताना पोलिसांच्या भीतीने माफियांनी वाळूने भरलेले टिप्पर एका घरावर खाली केले. त्यामुळे वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून पाच जणांचा मृत्यू झाला. टिप्पर चालकाच्या या कृत्यामुळे पाच गरीब मजुरांचा मृत्यू झाला या भीषण दुर्घटनेत फक्त दोन जण बचावले. या घटनेने जालना जिल्हा हादरला असून गावकऱ्यांमध्ये संताप उसळला आहे.
जाफराबाद तालुक्यातील पासोडी चांडोळ गावात रोडवर पूल बांधण्याचं काम सुरू आहे. सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथील मजूर या कामासाठी आले होते. पुलाचं बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी मजुरांसाठी पत्र्याचं शेड उभारण्यात आलं होतं. गणेश काशिनाथ धनवई (40), भूषण धनवई (16), सुनील समाधान सपकाळ (20), राजेंद्र दगडूबा वाघ (40) आणि सुपडू (38) हे त्या शेडमध्ये राहत होते. त्यांच्यासोबत एक महिला आणि 13 वर्षांची मुलगीही होती.
शुक्रवारी रात्री सर्वजण झोपले होते पुलाचं काम करणाऱ्या ठेकेदार रवींद्र आनंद याने स्वस्तात वाळू मिळावी म्हणून मध्यरात्री अवैध वाळू आणली. तीन वाजता एक ट्रक वाळू घेऊन आला. अंधारात घाईत टिप्पर चालकाने वाळू थेट पत्र्याच्या शेडवर टाकली. त्यामुळे पत्रे मोडून पडले आणि आत झोपलेले पाच मजूर वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबले. त्यांनी अंगावर रग घेतल्यामुळे हालचालही करू शकले नाहीत.
पहाट होईपर्यंत कुणालाही याची कल्पना नव्हती. सकाळी समोरच्या खोलीतील एक महिला बाहेर आली, तेव्हा तिला शेड दिसली नाही. तिने आरडाओरडा केला, गावकरी जमा झाले आणि ढिगाऱ्याखाली दबलेल्यांना बाहेर काढलं. टिप्पर चालक फरार झाला होता. सात जणांपैकी फक्त महिला आणि 13 वर्षांची मुलगी बचावल्या. बाकी पाच जणांचा मृत्यू झाला. गणेश आणि भूषण या बापलेकांचा मृत्यू झाला. सुनीलचाही दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबाचे उत्पन्न जेमतेम होते. दोन वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झालं होतं. घरात आजी, आई, भाऊ आणि बहीण असा परिवार होता.
माहिती मिळताच पोलीस तिथे पोहोचले गावकऱ्यांच्या मते, पोलिसांनी पंचनामा न करता मृतदेह नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गावकऱ्यांनी विरोध केला आणि मृतदेह नेण्यास थांबवलं. सध्या तिथे मृतांचे नातेवाईक आणि गावकऱ्यांचा आक्रोश सुरू आहे. ठेकेदार आणि टिप्पर चालकाच्या निष्काळजीपणामुळे पाच जणांचे प्राण गेले.
जाफराबाद तालुक्यात पूर्णा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा होतो. ही वाळू विदर्भातील विविध भागात पाठवली जाते. महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या अभयामुळेच ही घटना घडल्याचा आरोप नागरिक करत आहेत. रात्री वाळू वाहतुकीस प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचं नागरिक म्हणत आहेत मंडळी, या दुर्दैवी घटनेसाठी नेमकं कोण जबाबदार आहे? तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा.
0 टिप्पण्या