अंध अपंगांसह श्रावणबाळ योजनेचे मानधन चार महिन्यापासून थकले! राज्याची तिजोरी रिकामी?

 

Digital Gaavkari News 

लाखनी : समाजाचे आधारस्तंभ असलेले दिव्यांग बांधव व ज्येष्ठांचे चार महिन्यांचे मानधन रखडले आहे. दैनंदिन व्यवहारात अनेक अडचणींचा सामना लाभार्थ्यांना करावा लागत आहे. दरमहा मानधन देण्याची कबुली शासनाने सभागृहात करून सुद्धा कार्यवाही शून्य दिसत आहे. गत चार महिन्यापासून लाखनी तालुक्यातील लाभार्थी मानधनाच्या प्रतीक्षेत बँकेचे उंबरटे झिजवीत आहेत.

विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर लाभार्थ्यांना दरमहा निर्धारित निधी मिळण्याची मोठी आशा महायुती सरकारच्या वतीने मिळाली होती. केंद्र व राज्यात एकहाती सत्ता असल्याने निश्चितच ग्रामीण स्तरातील विकासाला हातभार लागण्याची शक्यता सर्वांनाच वाटत होती. मात्र प्रत्यक्षात वाईट अनुभव लाभार्थ्यांसह शेतकऱ्यांना सुद्धा दिसत आहेत. संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निराधार योजनेअंतर्गत विविध लाभार्थ्यांचे मानधन थकलेले आहेत. 

दिव्यांग बांधवांना शासनाच्या योजनेचा मोठा आधार आहे. त्याच निधीवर समाजात, कुटुंबात त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. परंतु प्रत्यक्षात त्यांना चार -चार महिने मानधन मिळत नसल्याने शासनाची तिजोरी रिकामी झाली काय? असा प्रश्न लाभार्थी शासनाला विचारत आहेत.

लाडक्या बहिणींचा मोठा पुळका! 

शासनाने निर्धारित सर्वच सन्मानधीन योजनांचा सन्मान करणे गरजेचे आहे. मात्र प्रत्यक्षात अंधअपंगांसह ज्येष्ठांचे मानधन थकीत करून नव्याने सुरू झालेल्या लाडक्या बहिणींचा सन्मान शासन स्तरावरून वाढला आहे. त्यांचा एवढा विशेष पुळका का? असा संतप्त सवाल अंधअपंग विचारीत आहेत.

अंधअपंगांचे मानधन थांबविणे निश्चितच चुकीचे आहे. सरकारने त्यांच्या व्यथा वेदनांचा अभ्यास करावा. लाखनी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील अंधअपंगांचे मानधन प्रतीक्षेत आहेत. शक्य तितक्या लवकर शासनाने सहकार्य करावे. अन्यथा जिल्हास्तरावर आंदोलन उभे करावे लागेल.

नरेंद्र मेश्राम जिल्हाध्यक्ष 

विदर्भ दिव्यांग कल्याण समिती भंडारा 

सरकारने किमान अंधअपंगांचे मानधन दरमहा कर्मचाऱ्यांप्रमाणे द्यावे. महागाईच्या काळात पंधराशे रुपये निश्चितच अत्यल्प आहेत. तेही वेळेत मिळत नाही ,ही मोठी शोकांतिका आहे. 

धनंजय घाटबांधे माजी पंचायत समिती सदस्य किटाडी

डीबीटी अंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यावर शासनस्तरावरून मानधन वळते करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लाभार्थ्यांनी तलाठी कार्यालयात खातेपासबुक, आधारकार्डची झेरॉक्स पुरवावी. लाभार्थ्यांना काही समस्या असल्यास तहसील कार्यालयात भेट द्यावी. 

धनंजय देशमुख तहसीलदार लाखनी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या