पालांदुरात गोपालकाला व महाप्रसादाने भागवत सप्ताहाची सांगता नाना पटोले यांच्या हस्ते दहीहंडी .


Digital Gaavkari News

पालांदूर : येथील सार्वजनिक हनुमान मंदिरात श्रीमद् देवी भागवत सप्ताहाची सांगता गोपालकाला व महाप्रसादाने करण्यात आली. गुरुवर्य हरिभक्त परायण बांगरे महाराज यांच्या अमृततुल्यवाणीतून सात दिवस भक्तिरसाची गंगा वाहली. शेवटच्या दिवशी आमदार नाना पटोले व भक्तगणांच्या उपस्थितीत दहीहंडी फोडण्यात आली. हजारो भक्तगणांनी यावेळी हजेरी लावून भगवतभक्तीचा महिमा चाखला.

पालांदूर कवलेवाडा व मेंगापूर च्या संयुक्त विद्यमाने रोप्यमहोत्सवी भागवत सप्ताह नंतर २६ व्यावर्षी सुद्धा अत्यंत भक्तिमय वातावरणात हरिनामाचा गजर झाला.

गुरुवर्य म्हणाले, भुकेल्यांना अन्न द्यावे, तहानल्यांना पाणी पाजावे, भरकटल्यांना रस्ता दाखवावे, भवसागर तारून जाण्यासाठी मनुष्याने भागवत भक्तीचा आधार घ्यावा. पुरुषार्थ साधून वाल्याचा वाल्मीक व्हावे म्हणजे कर्तव्याशी एकनिष्ठ राहून अपेक्षित ध्येय गाठावे. भागवत म्हणजे वक्ते व श्रोता यांचा संवाद होय.

भागवत श्रवणाने अंतरात्मा शुद्ध होतो. सत्याची कास धरून आदर्श जीवन जगा. रामचरित्र डोळ्यापुढे ठेवा ,संतांची शिकवण अंगीकारून समाजात सन्मानाने जगा. आकस बुद्धी सोडा, दानाने धनाची शुद्धी होते. निरमोह, सोज्वळ, निर्व्यसनी राहुन दिव्य आयुष्य जगण्याची कला भागवत शिकवितो. असे सात दिवसीय भागवतात मनुष्याला भवसागर तारुण जाण्याकरिता साध्या सरळ सोप्या भाषेत प्रबोधन पार पडले.

हरिनाम भागवतात काकड आरती, हरिपाठ, सहस्त्रनाम ,कीर्तन व भजन कार्यक्रमाच्या व्यस्ततेत सप्ताह पार पडला. गोपालकाल्याच्या किर्तनाला (कार्यक्रमात )आमदार नाना पटोले, जिल्हा मजूर संघाचे अध्यक्ष भरत खंडाईत, सरपंच लता कापसे, सरपंच मनीषा खंडाईत, जि प सदस्य सरिता कापसे, प स सदस्य योगिता झलके, सरपंच योगेश झलके खराशी, अध्यक्ष विजय कापसे सेवा स. संस्था पालांदूर, डॉक्टर आशिष गभने, स्वप्निल खंडाईत, मंदिर कमिटीचे अध्यक्ष ईश्वर तलमले, हभप नारायण काजळखाने, हभप दशरथ मेश्राम, सुभाष मेश्राम, हनुमान देवस्थान कमिटीचे पदाधिकारी, हभप बांगरे पळसगाव, सुश्री वैशु दीदी, सुश्री दुर्गाताई यासह लक्षणीय भक्तगणांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या