टेलिकॉम कंपन्यांची दरवाढ आणि TRAI चे नवे नियम ग्राहकांसाठी मोठा दिलासा.
गेल्या काही महिन्यांमध्ये, जिओ, व्हीआय, आणि एअरटेल या मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या दरात जवळपास 25% पर्यंत वाढ केली होती. यामुळे सोशल मीडियावर ग्राहकांच्या संतापाला उधाण आले. "बॉयकॉट जिओ", "बॉयकॉट व्हीआय", आणि "बॉयकॉट एअरटेल" हे हॅशटॅग मोठ्या प्रमाणात ट्रेंड झाले. त्याच वेळी, "BSNL की घर वापसी" हा हॅशटॅगही चर्चेत होता.दरवाढीनंतर अनेक ग्राहकांनी या कंपन्यांचे प्लॅन्स सोडून BSNL कडे वळण्याचा विचार केला. यातून BSNL ने मोठ्या प्रमाणावर नवीन ग्राहक जोडले. मात्र, मोठ्या खाजगी कंपन्यांनी ही दरवाढ मागे घेतली नाही.
TRAI चे नवे नियम
ग्राहकांच्या या असंतोषाची दखल घेत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने काही नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. TRAI च्या या निर्णयामुळे प्रामुख्याने फिचर फोन वापरणाऱ्या आणि इंटरनेट न वापरणाऱ्या ग्राहकांना फायदा होणार आहे.
फक्त टॉकटाइम आणि SMS रिचार्जची सुविधा
फिचर फोन वापरणाऱ्या लोकांसाठी आता फक्त टॉकटाइम आणि SMS रिचार्ज करणे शक्य होणार आहे.
आधी इंटरनेट वापरणाऱ्या ग्राहकांसाठीच असलेले महागडे अनलिमिटेड पॅक्स आता बंधनकारक राहणार नाहीत.
स्पेशल रिचार्जची वैधता वाढवली
सध्या स्पेशल रिचार्ज कुपनची 90 दिवसांची वैधता 365 दिवसांपर्यंत करण्यात आली आहे.
लवचिक रिचार्ज योजना
छोट्या रिचार्ज वाउचर्ससाठी आधीची ₹10 च्या पटीतील किंमतीची बंधनं काढून टाकण्यात आली आहेत. आता कंपन्या ₹16, ₹24, ₹33 अशा किंमती ठरवू शकतात.
टेलिकॉम कंपन्यांचा विरोध
जिओ, व्हीआय, आणि एअरटेल यांसारख्या कंपन्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. त्यांचा दावा आहे की या बदलांमुळे त्यांचा "एव्हरेज रेव्हेन्यू पर युजर" (ARPU) कमी होईल. उदाहरणार्थ, जिओचा ARPU सध्या ₹200 पेक्षा कमी आहे, तर एअरटेलचा ₹209 आहे. हा आकडा वाढवून ₹300 पर्यंत नेण्याचा कंपन्यांचा उद्देश आहे.
BSNL ला काय होणारा फायदा
TRAI च्या या नव्या नियमांमुळे BSNL चा फायदा होण्याची शक्यता आहे. 2024 च्या सुरुवातीपासूनच BSNL ने मोठ्या प्रमाणावर ग्राहक जोडले आहेत. जर BSNL ने त्यांचे नेटवर्क आणि 4G/5G सुविधा लवकर उपलब्ध केल्या, तर हे बदल सरकारी कंपनीसाठी फायदेशीर ठरू शकतात.
ग्राहकांसाठी महत्त्वाचा निर्णय
TRAI च्या या निर्णयामुळे भारतातील फिचर फोन वापरणाऱ्या 15 कोटी ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक, ड्युअल सिम वापरणारे लोक, आणि इंटरनेट न वापरणारे ग्राहक या नियमांमुळे स्वस्त आणि उपयुक्त रिचार्ज करू शकतील.
तुम्हाला या नियमांबद्दल काय वाटते हे तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.
0 टिप्पण्या