नरेंद्र मेश्राम जिल्हा प्रतिनिधी
भंडारा :- लाखनी येथे दि.11 डिसेंबर 2024 ला गीता जयंतीच्या निमित्ताने समर्थ विद्यालय तथा कनिष्ठ महविद्यालय आणि राणी लक्ष्मीबाई विद्यालय येथे एक ऐतिहासिक उपक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ उदय राजहंस, डॉ प्रतिभा राजहंस, मुख्याध्यापक अनिल बडवाईक, अनिल पुडके, अक्षय मासुरकर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. या शाळांमधील शंभर विद्यार्थ्यांनी श्रीमद् भगवद्गीतेतील बारावा व पंधराव्या अध्यायांचे सामूहिक पठण केले.
राष्ट्र सेविका समिती, लाखनी नगराच्या सेविकांनी गेल्या तीन महिन्यांपासून या शाळांमध्ये नियमितरित्या विद्यार्थ्यांकडून गीता पठणाचा सराव करवून घेतला. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने गीता पठण सादर केले, ज्यामुळे या उपक्रमाचे महत्त्व अधिक वृद्धिंगत झाले.
या उपक्रमामध्ये सौ. रोझा कापगते, डॉ. सौ. मुक्ता आगाशे, सौ. गीता गायधने, सौ. माधुरी घटवाई, सौ. भारती काळे, सौ. पद्मा लुटे, सौ. माया बोटकवार, सौ. सारिका रेईपाडे, सौ. रेखा पाखमोडे, आणि डॉ. सौ. प्रतिभा राजहंस यांनी विशेष सेवा दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना भगवद्गीतेचे महत्त्व, त्यातील शिकवणी, आणि त्याचा जीवनावर होणारा प्रभाव समजावून दिला.
डॉ. उदय राजहंस यांचे प्रेरणादायी मार्गदर्शनकार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. उदय राजहंस यांनी उपस्थितांना भगवद्गीतेच्या पठणाचे महत्त्व विशद केले. त्यांनी गीतेच्या शिकवणींमुळे व्यक्तिमत्त्व विकास, मानसिक शांतता, आणि शाश्वत जीवनमूल्ये कशी साधता येतात, याविषयी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
लाखनी नगरात पहिल्यांदाच अशा स्वरूपाचा उपक्रम राबवला गेला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना गीतेच्या अध्ययनाची गोडी लागली, तसेच पालक आणि शिक्षक वर्गातूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या ऐतिहासिक उपक्रमाने लाखनी नगराच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्राला एक नवा आयाम दिला आहे. भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान समाजात रुजवण्यासाठी असे उपक्रम भविष्यातही राबवले जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
0 टिप्पण्या