साकोली विधानसभेमधे पारंपारिक व्होटबँक इतरत्र वळल्याने उमेदवार अडचणीत.



डिजिटल गावकरी 
नरेंद्र मेश्राम 

भडारा :- ६२ साकोली विधानसभा क्षेत्रात महायुतीत बंडोखोरी तर काँग्रेस चा परंपरागत व्होट बँकेत वंचित बहुजन आघाडीने सेंदमारी केल्याने महायुतीसह महाविकास आघाडीच्या उमेदवारात अनिश्चिततेचे वातावरण पसरले आहे. तर वंचित बहुजन आघाडी व अपक्ष निर्णायक लढतीत आले आहेत. त्यामुळे या विधानसभा क्षेत्रातील निवडणूक रोमांचक होणार आहे. प्रचारास ३ दिवस शिल्लक असून उमेदवार कोणती विव्ह रचना करतात यावर उमेदवाराचा जय-पराजय अवलंबून असणार आहे. साकोली विधानसभा मतदार क्षेत्रात एकाही पक्षाकडून मोठ्या नेत्याची प्रचारसभा घेतली नसल्यामुळे मतदारांत "मॅनेज" च्या चर्चांना पेव फुटले आहे.
६२ साकोली विधानसभा निर्वाचन क्षेत्रात राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त पक्षाचे ३, नोंदणीकृत राजकीय पक्षाचे ४ तर स्वतंत्र ६ असे एकूण १३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. महाविकास आघाडीप्रणित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे उमेदवार विद्यमान आमदार नाना पटोले, महायुतीचे घटकपक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीचे अविनाश ब्राह्मणकर, बसपा चे रोशन फुले, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. अविनाश नांन्हे तर अपक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर यांचेसह इतर ८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या मतदार संघाचा या आधीचा इतिहास पाहता या मतदार संघावर भारतीय जनता पार्टीचे प्राबल्य असल्याचे दिसून येते. पण या विधानसभा निवडणुकीत भाजपा ने ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) गटाचे जिल्हा परिषद सदस्य अविनाश ब्राह्मणकर यांना आयात करून त्यांना उमेदवारी दिल्यामुळे निष्ठावंत दुखावले व सोमदत्त करंजेकर यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहेत.

साकोली विधानसभा क्षेत्रातून कुणबीच उमेदवार निवडला जातो. असा फेक नरेटीव्ह प्रस्थापितांकडून पसरविला जातो. पण वस्तुस्थिती एकदम वेगळी आहे. या मतदार संघातून ५ ते ६ वेळा कोहळी तर २ वेळा कलार समाजाचा उमेदवार निवडून आलेला आहे. काँग्रेस चा परंपरागत व्होट बँक म्हणून बौद्ध समाज, आदिवासी, गोवारी व ढीवर समाज होता. पण ह्या तिन्ही वंचित समाजाची वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. बाळासाहेब उपाख्य प्रकाश आंबेडकर यांनी मोट बांधून हा व्होटबँक आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला असून त्यात त्यांना यशही आले आहे. तर भाजपात बंडखोरी झाल्यामुळे त्यांच्या परंपरागत व्होट बँकेचे शकले झाली आहेत. तसेच महाविकास आघाडी व महायुतीचे उमेदवार परस्परांचे नातेवाईक असल्यामुळे नातेसंबंधातील मतदानही विभागले गेले असल्यामुळे या उमेदवारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

साकोली विधानसभा मतदार संघात १३ उमेदवार असले तरी मुख्य लढत काँग्रेस चे आमदार नाना पटोले, भाजपा चे अविनाश ब्राह्मणकर, वंचित बहुजन आघाडी चे डॉ. अविनाश नान्हे तर अपक्ष सोमदत्त करंजेकर यांच्यातच आहे. काँग्रेस ची व्होट बँक असलेले बौद्ध व ढीवर समाज यांचा वंचित बहुजन आघाडीकडे कल दिसून येतो. तर भाजपा चा परंपरागत व्होटबँक असलेला तेली समाजाचा कल अपक्ष सोमदत्त करंजेकर यांचेकडे दिसून येत असल्यामुळे या निवडणूक कोणाचे भाग्य उजळेल. हे शेवटच्या क्षणापर्यंत सांगता येणार नसले तरी खरी लढत काँग्रेस, भाजपा, वंचित व अपक्ष उमेदवारातच होणार आहे. सर्वच उमेदवारांनी पूर्ण ताकदीनिशी प्रचार सुरू केला असल्यामुळे आघाडी कोण घेतो ही उमेदवारातच स्पर्धा लागली असली तरी परंपरागत व्होट बँक इतरत्र वळती झाल्यामुळे राजकीय पक्षाच्या उमेदवारात धडकी भरली आहे. अशा साकोली विधानसभा मतदार संघात चर्चा होत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या