डिजिटल गावकरी न्यूज
दुर्गाप्रसाद घरतकर
अर्जुनी मोरगांव : मौजा कवठा, ता. अर्जुनी/मोर, जि. गोंदिया येथील कोकणाई माता देवस्थानाला अधिकृत पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन परिसराचा सर्वांगीण विकास करावा, या मागणीसाठी दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी सडक अर्जुनी येथे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री राजकुमारजी बडोले साहेबांना निवेदन देण्यात आले.
कवठा येथील कोकणाई माता देवस्थान हे परिसरातील नागरिकांचे श्रद्धास्थान असून या ठिकाणी धार्मिक, ऐतिहासिक तसेच नैसर्गिक महत्त्व असल्याने दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक व नागरिक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे या देवस्थानाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास केल्यास परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळण्यासोबतच स्थानिक नागरिक व बेरोजगार युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली.
देवस्थान परिसरात चांगले रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, विद्युत व्यवस्था, पार्किंगची सुविधा, निवास व्यवस्था तसेच इतर आवश्यक पर्यटन सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच कोकणाई माता देवस्थान, कवठा यास शासन स्तरावर अधिकृत पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करून प्रस्ताव मंजूर करावा आणि देवस्थानाच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
परिसरातील नागरिकांच्या या मागणीची शासन व संबंधित विभागाने गांभीर्याने दखल घेऊन कोकणाई माता देवस्थानाच्या विकासासाठी सकारात्मक पावले उचलावीत, अशी अपेक्षा कवठा बोलदे येथील निवेदनकर्त्यांनी व्यक्त केली.
आमदार साहेबांना निवेदन सादर करताना सौ. सरिता लंजे, सुनिता लंजे, सुरेश परशुरामकर, योगराज लंजे, जागेश्वर मेंढे, ईश्वरदास भंडारी, राहुल लंजे, पदमाकर चौधरी, हसन भंडारी, प्रमोद नारनवरे, राजेंद्र डोंगरवार, अथर्व मेंढे, दुर्वास लंजे, निखिल चौधरी, दुशांत चौधरी, गौरव मुंगमोडे, योगेश राऊत, मंगेश लंजे, अर्जुन पुस्तोडे, सचिन लंजे, अजय परशुरामकर, चेतन मडावी, कुणाल सरोते, राहुल नेवारे आणि रोहित लंजे यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.
कोकणाई माता देवस्थानाला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाल्यास धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक अर्थव्यवस्था, रोजगार आणि परिसरातील मूलभूत सुविधांच्या विकासाला मोठी गती मिळू शकते. त्यामुळे आता शासन या मागणीवर कोणती भूमिका घेते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

0 टिप्पण्या