Digital Gaavkari News
Durgaprasad Gharatkar
गडचिरोली : जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील खाजगी अनुदानित निवासी आश्रमशाळेत घडलेल्या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची घटना समोर आली असून, यामध्ये तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अन्य तीन विद्यार्थिनींवर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
प्राथमिक माहितीनुसार, रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. विद्यार्थिनी वसतिगृहात असताना सर्पदंश झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी गडचिरोली जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला.
घटनेनंतर प्रशासन आणि पोलिसांची धाव
घटना समोर येताच आदिवासी प्रकल्प विभागाचे अधिकारी तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेची चौकशी सुरू असून सर्पदंश नेमका कसा झाला, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या आणि घटनेच्या वेळी वसतिगृहात देखरेख व्यवस्था कशी होती, याची माहिती घेतली जात आहे.
या घटनेमुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतली घटनेची दखल
गडचिरोलीतील या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून, याबाबत अधिक माहिती मागवण्यात आल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, जपतलाई येथील संबंधित आश्रमशाळा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. विश्वजीत कोवासे यांच्या परिवाराशी संबंधित असल्याची माहिती समोर आल्याचे सांगितले जात आहे. या बाबीची अधिकृत माहिती आणि तपासातून नेमके तथ्य काय समोर येते, हे स्पष्ट होणे बाकी आहे.
चंद्रपूरमधील आश्रमशाळेतही गंभीर प्रकार
दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील एका खाजगी अनुदानित आश्रमशाळेतही अल्पवयीन विद्यार्थ्यांशी संबंधित गंभीर घटना समोर आली आहे. पाचवीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून अन्य दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
पीडित विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्यानंतर हा प्रकार समोर आला. पोलिसांनी या प्रकरणात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी आणि पीडित विद्यार्थी एकाच खोलीत राहत असल्याची माहिती असून, वसतिगृहातील सुमारे 35 विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
आरोपी विद्यार्थी अल्पवयीन असल्याने त्यांच्यावर कायद्यानुसार पुढील कारवाई केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
आश्रमशाळांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
गडचिरोलीतील सर्पदंशाची घटना आणि चंद्रपूरमधील गंभीर प्रकरण यामुळे आदिवासी भागातील निवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
वसतिगृहांची नियमित तपासणी, विषारी सापांपासून संरक्षणासाठी प्रतिबंधात्मक उपाय, रात्रीची देखरेख, आपत्कालीन वैद्यकीय सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक कर्मचारी उपलब्ध आहेत का, याची तपासणी करण्याची मागणी होत आहे.
पालक आणि नागरिकांकडून आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची मागणी होत आहे. या दोन्ही घटनांची सखोल चौकशी करून निष्काळजीपणा किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी, अशीही मागणी केली जात आहे.

0 टिप्पण्या