गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील इंजेवारी गावात वाघाच्या हल्ल्यात ६३ वर्षीय कुंदा खुशाल मेश्राम यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज (२ डिसेंबर) दुपारी ४ वाजता घडली. धान कापणी व मळणीच्या हंगामात सलग दोन भीषण घटना घडल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
शेतावर गेल्यानंतर बेपत्ता, शोध घेतल्यावर मृतदेह आढळला
कुंदा मेश्राम सकाळी ११ वाजता शेतात गेल्या होत्या. दुपारी नातू किसन हा त्यांना घरी आणण्यासाठी गेला असता त्या शेतात आढळल्या नाहीत. संशय आल्याने किसनने घरी जाऊन आईसह काही ग्रामस्थांना घेत शेत परिसरात शोध घेतला. अखेर शेतापासून काही अंतरावर कुंदा मेश्राम यांचा मृतदेह आढळून आला.
कुंदा मेश्राम यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले असून त्यांच्या मागे एक मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे.
अमोल मारकवार यांची भेट, आर्थिक मदतीची मागणी
घटनेची माहिती मिळताच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अमोल मारकवार यांनी मेश्राम कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
शासनाने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच, परिसरात वाघाचा बंदोबस्त तातडीने न केल्यास चक्काजाम आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
मारकवार यांनी सांगितले की, “अलीकडेच महिलांवर हल्ल्यांच्या घटना वाढल्या असून वनविभागाने गंभीरतेने लक्ष द्यावे.”
१२ दिवसांत दुसरा बळी
याआधी २० नोव्हेंबर रोजी इंजेवारीजवळील देऊळगाव बुटी येथे मुक्ताबाई नेवारे आणि अनुसया वाघ या दोन महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.
केवळ १२ दिवसांत दुसरी घटना घडल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
धान हंगामात शेतकऱ्यांची वाढती चिंता
सध्या धान कापणी आणि मळणीचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांना दिवसभर शेतात जावे लागत आहे. पण
वाघाच्या सततच्या हालचाली आणि हल्ल्यांमुळे शेतात जाणे धोकादायक झाले आहे, अशी ग्रामस्थांची चिंता आहे.
ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असून योग्य उपाययोजना न झाल्यास व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

0 टिप्पण्या