डिजिटल गावकरी न्यूज
Nandel News : नांदेडमध्ये आंतरजातीय प्रेमसंबंधाला विरोध केल्यामुळे 25 वर्षीय सक्षम ताटेची निर्घृण हत्या झाल्याप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. सक्षम आणि 21 वर्षीय आचल यांचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र दोघांची जात वेगळी असल्याने आचलच्या कुटुंबीयांनी या नात्याला तीव्र विरोध केला. आचलच्या सांगण्यानुसार तिचे वडील गजानन मामेडवार आणि भाऊ हिमेश व साहिल मामेड हे सतत सक्षमला मारण्याच्या धमक्या देत होते. “तू कोणासोबतही लग्न कर, पण त्याच्याशी नको,” असा दबाव तिच्यावर वारंवार आणला जात होता. शेवटी या विरोधातूनच आरोपींनी सक्षमला गोड बोलून भेटायला बोलावले व त्याच्यावर सलग तीन गोळ्या झाडल्या. गोळ्या झाडल्यानंतरही तो काही क्षण जिवंत असल्याचे दिसताच आरोपींनी त्याच्या डोक्यात फरशी टाकून त्याची हत्या केली, असे आचलने पोलिसांना सांगितले आहे.
ही बातमी मिळताच आचल थेट सक्षमच्या घरी धावत पोहोचली. त्याचे पार्थिव पाहून ती कोसळली आणि जगासमोरच धक्कादायक निर्णय घेतला. “सक्षम आता नसला तरी आमचं प्रेम आहे. मी त्याचीच राहणार,” असे सांगत तिने सक्षमच्या पार्थिवाजवळच प्रतीकात्मक विधी करून ‘लग्न’ केले. तिच्या या निर्णयामुळे समाजभर मोठी चर्चा रंगली आहे. एका बाजूने प्रेमिकाची हत्या झाल्याचा संताप आहे, तर दुसऱ्या बाजूला अशा परिस्थितीतही आचलने प्रेम जपण्यासाठी उचललेल्या पावलाचे कौतुक करत अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.
सक्षमच्या मृत्यूनंतर आचलने त्याच्या घरीच कायम राहण्याचा निर्णय घेतला असून “माझं वय पूर्ण झालंय, मी माझ्या मनाने निर्णय घेऊ शकते. माझ्यावर कोणाचीही जबरदस्ती नाही,” असे ती म्हणाली. सक्षमच्या कुटुंबीयांनी तिला राहण्याची परवानगी दिल्याचेही ती सांगते. मात्र तिच्या या निर्णयानंतर आरोपी असलेले तिचे वडील आणि दोन्ही भाऊ यांच्याविषयी कठोर कारवाईची मागणी जिल्हाभर सुरू आहे. पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
या घटनेमुळे नांदेडसह संपूर्ण राज्यात संताप आणि दुःखाची भावना व्यक्त होत आहे. जातीय मतभेद, प्रेमसंबंधांवरील कुटुंबाचा दबाव आणि प्रेयसीने पार्थिवाशी केलेले लग्न या सर्व कारणांमुळे ही घटना महाराष्ट्रभर चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे. सामाजिक माध्यमांवरही या प्रकरणावर प्रतिक्रिया आणि मतप्रदर्शन सुरू असून समाजाने नेमकी कोणती भूमिका घ्यावी, यावरही चर्चा वाढत आहे.

0 टिप्पण्या