
डिजिटल गावकरी न्यूज.
दुर्गाप्रसाद घरतकर.
Gondia Nagarparishad Election : गोंदिया जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला असून, हा निर्णय कार्यकर्त्यांच्या भावना आणि तयारी पाहून घेण्यात आल्याचे खासदार प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले आहे. गोंदियात पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, स्थानिक निवडणुका या कार्यकर्त्यांच्या भावनांशी निगडित असतात आणि यावेळी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळेच पक्षाने स्वबळाचा मार्ग स्वीकारला आहे. प्रफुल पटेल यांच्या या घोषणेनंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गोंदिया जिल्ह्यात येणाऱ्या काळात गोंदिया आणि तिरोडा या दोन नगरपरिषदांसह गोरेगाव आणि सालेकसा या नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या चारही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर उमेदवार देणार असल्याने जिल्ह्याचे राजकीय चित्र बदलण्याची शक्यता आहे. दरम्यान या निर्णयामुळे इतर पक्षांसाठीही रणनीती आखणे आव्हानात्मक ठरणार आहे. भाजप, काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट या सर्वांनी आता आपापल्या आघाड्या आणि उमेदवारीचे गणित पुन्हा मांडण्याची तयारी सुरू केली आहे.
गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मजबूत पाया असल्याने स्वबळाचा निर्णय हा पक्षासाठी फायदेशीर ठरेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. स्थानिक पातळीवरील मुद्दे, विकासकामे, पाणीपुरवठा, नागरिक सुविधा, रस्ते–गटार व्यवस्था अशा महत्त्वाच्या विषयांवर या निवडणुकांमध्ये चुरस राहणार आहे. प्रफुल पटेल यांच्या या निर्णयामुळे आगामी काही दिवसांत प्रचाराची गती वाढेल आणि चारही ठिकाणी राजकीय तापमान चांगलेच चढेल, हे निश्चित.
0 टिप्पण्या