डिजिटल गावकरी न्यूज
दुर्गाप्रसाद घरतकर
अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील एलोडी/जांभळी येथे मंडईनिमित्त आयोजित नाटकाचे भव्य उद्घाटन मंगळवारी पार पडले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. स्थानिक नागरिक, कलावंत, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर अशा मोठ्या संख्येने लोकांनी या कार्यक्रमास हजेरी लावली.
कार्यक्रमाचे उद्घाटन पारंपरिक पद्धतीने दीपप्रज्वलन करून करण्यात आले. उद्घाटनानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ग्रामीण भागात सांस्कृतिक परंपरा जपण्याचे आणि नव्या पिढीला कलात्मकता शिकवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी कलावंतांच्या सादरीकरणाचे खास कौतुक करत म्हटले की, “गावागावातील कलाकारांमध्ये असलेली गुणवत्ता, मेहनत आणि कला ही आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे.”
नाटकाच्या आयोजकांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. “ग्रामीण भागात अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन झाल्याने तरुणाईला प्रोत्साहन मिळते आणि कलावंतांना आपली कला सादर करण्याची मोठी संधी मिळते,” असे मत भेंडारकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमात स्थानिक कलाकारांनी सादर केलेले सामाजिक संदेश देणारे नाट्यप्रयोग प्रेक्षकांची मने जिंकणारे ठरले. हास्य, विनोद, भावनिक आणि सामाजिक वास्तव दाखवणारे विविध प्रसंग नाटकात मांडण्यात आले होते. प्रेक्षकांनीही टाळ्यांच्या गजरात कलाकारांना दाद दिली.
यावेळी मंडई निमित्त परिसरात सणासुदीचे वातावरण पाहायला मिळाले. व्यापारी, शेतकरी, कुटुंबांसह सर्व स्तरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला.

0 टिप्पण्या