Arjuni Morgaon, Gondia
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कवठा/बोळदे शिवारात दुर्दैवी घटना समोर आली आहे. शेतात जमा करून ठेवलेला धानाचा पुंजना अचानक लागलेल्या आगीमध्ये जळून खाक झाला असून या घटनेमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बोळदे येथील अल्पभूधारक शेतकरी प्रशांत रतीराम वालदे यांच्या शेतात हा प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत वालदे यांनी सव्वा एकर क्षेत्रातील धानाची कापणी पूर्ण करून त्याचा पुंजना शिवारात साठवून ठेवला होता. मात्र मंगळवारी दुपारच्या सुमारास या पुंजन्याला अचानक आग लागली. काही वेळातच ज्वाळांनी रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण पुंजना जळून खाक झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आपल्या परीने आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत सर्व धान जळून नष्ट झाले होते. या आगीत शेतकऱ्याचे जवळपास ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून शेतकरी तसेच ग्रामस्थांनी प्रशासनाकडे पंचनामा करून योग्य ती मदत देण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

0 टिप्पण्या