जालना धक्कादायक खून प्रकरण: वहिनी–दीरच्या अनैतिक संबंधातून मोठ्या भावाचा निघाला बळी; दोघेही पोलिसांच्या ताब्यात.


डिजिटल गावकरी न्यूज

Jalana News: नमस्कार मंडळी जालना जिल्ह्यातील सोमठाणा (शान साधगाव) परिसरात नात्याला काळिमा फासणारी थरारक घटना उघडकीस आली आहे. परमेश्वर तायडे या तरुणाची त्याची पत्नी मनीषा आणि सख्खा धाकटा भाऊ ज्ञानेश्वर यांनी मिळून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनैतिक संबंधांतून जन्माला आलेला हा खून सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलाय.

अनैतिक संबंधांची सुरुवात…

परमेश्वर आणि मनीषा यांचा संसार सुरळीत सुरू होता. दोघांना दोन लहान मुलीही आहेत. विवाहित आयुष्यात नंतर परमेश्वरने घराजवळच शेड बांधून पत्नी आणि मुलींसह वास्तव्य केले. परमेश्वर हार्वेस्टरच्या कामानिमित्त दिवसभर बाहेर असायचा. या काळात धाकटा भाऊ ज्ञानेश्वर घरात ये-जा करत असे. याच ओळखीपासून दोघांमध्ये जवळीक वाढत गेली आणि प्रेमसंबंध आकाराला येऊ लागले.

गावात ही चर्चा पोहोचताच परमेश्वरलाही संशय आला. त्याने ज्ञानेश्वरसोबतची पार्टनरशिप तोडली आणि दोघांना समज देण्याचा प्रयत्न केला. परंतु दोघेही ऐकायला तयार नव्हते. अखेर परमेश्वरला कायमचा मार्गातून दूर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

१५ ऑक्टोबरची रात्रीची घटना

१५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीचा सुकाळ पाहून मनीषाने आपल्या पतीच्या झोपेची खात्री केली. त्यानंतर तिने ज्ञानेश्वरला फोन करून घरी बोलावले. मनीषाने घराची कडी उघडून त्याच्या हातात कुऱ्हाड दिली. ज्ञानेश्वरने झोपेत असलेल्या परमेश्वरच्या चेहऱ्यावर आणि मानेवर वार केले. बाहेर आवाज जाऊ नये म्हणून मनीषाने त्याचे तोंड घट्ट दाबून धरले. जागीच परमेश्वरचा मृत्यू झाला.

यानंतर दोघांनी मिळून मृतदेह कॅरीबॅगमध्ये गुंडाळत एका मोठ्या गोणीत भरला. दुचाकीवर मृतदेह घेऊन ते वालासोमठाणा तलावाकाठी गेले. पाण्यात मृतदेह बुडून राहावा म्हणून गोणीला मोठा दगड बांधण्यात आला.

वडिलांचा संशय, पोलिसांत तक्रार

१६ ऑक्टोबर रोजी परमेश्वरचे वडील राम तायडे नेहमीप्रमाणे घराकडे आले. मुलगा दिसत नसल्याने त्यांनी मनीषाला विचारणा केली. तिने "ते खाटूशाम महाराजांच्या दर्शनाला गेले आहेत" असे सांगितले. परंतु फोन बंद असल्यामुळे वडिलांच्या मनात संशय निर्माण झाला. अखेर २० ऑक्टोबर रोजी त्यांनी बदनापूर पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार केली.

१२ नोव्हेंबरला तलावात तरंगलेला मृतदेह

१२ नोव्हेंबर रोजी वालासोमठाणा तलावात एक मृतदेह असल्याची माहिती मिळाली. स्थळावर पोहोचलेल्या राम तायडे यांनी तो मृतदेह त्यांच्या मुलगा परमेश्वरचा असल्याची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी या मृत्यूचा तपास सुरू केला.

चौकशीत कबुली

याआधीच पोलिसांना मनीषा आणि ज्ञानेश्वर यांच्यातील अनैतिक संबंधांची माहिती मिळाली होती. तांत्रिक पुरावे, कॉल रेकॉर्ड, लोकेशन यावरून पोलिसांना दोघांवर संशय आला आणि दोघांना ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांनी गुन्हा नाकारला. परंतु पोलिसांनी पुरावे समोर ठेवल्यानंतर मनीषा कोसळली आणि संपूर्ण हकीकत कबूल केली.

तिने सांगितले की

"मी मफलरने पतीचा गळा आवळला,

ज्ञानेश्वरने कुऱ्हाडीने वार केले,

दोघांनी मिळून मृतदेह तलावात फेकला."

खुनाचा गुन्हा दाखल

राम तायडे यांच्या फिर्यादीवरून

ज्ञानेश्वर राम तायडे आणि मनीषा परमेश्वर तायडे

यांच्यावर खुनाचा गुन्हा बदनापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुर्वसे हे करत आहेत.

नात्याला काळिमा फासणारी घटना

आईसमान वहिनी आणि सख्खाधाकटा भाऊ या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने गावभर खळबळ उडाली आहे. छोट्या मत्सरातून आणि अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या या कटकारस्थानाचा शेवट एका निर्दोष पतीच्या मृत्यूने झाला. आता दोघांवर कायदेशीर कारवाई होत असून दोघेही कारागृहात आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या