गोंदिया | 13 नोव्हेंबर 2025 – गोंदिया तालुक्यातील डांगोर्ली येथे मंडई कार्यक्रमादरम्यान एका तरुणावर लोखंडी कड्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना 11 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा डांगोर्ली गावातील मंडई परिसरात घडली असून, या प्रकरणी रावणवाडी पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी यश कारोशिया हा आपल्या मित्रांसोबत मंडईत झुल्याजवळ उभा असताना एक अनोळखी इसम त्याच्याशी वाद घालू लागला. त्याने "तू कुठे राहतोस? तुझे नाव काय?" असे विचारत असताना वाद चिघळला. या दरम्यान आरोपी प्रणय तिवारी यांनी मागून येत आपल्या हातातील लोखंडी कड्याने यश कारोशियाच्या डोक्यावर प्रहार केला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला.
यानंतर, आरोपी दादू उपवंशी, समीर मस्करे आणि आदित्य शहारे यांनी फिर्यादी घरी जाण्यास निघाला असताना त्याच्या गाडीपाशी येऊन त्याला थप्पड-बुक्क्यांनी मारहाण केली.
जखमी यश कारोशियाने तातडीने रावणवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
स्थानिक मंडई परिसरात या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत आरोपींचा शोध सुरू केला आहे.
तपास अधिकारी सांगतात की, या प्रकरणात प्राथमिक तपास सुरू असून, साक्षीदारांचे जबाब घेतले जात आहेत. मंडईत झालेल्या या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

0 टिप्पण्या