नागपूर जिल्ह्यात दिग्रज पोस्ट ऑफिसमध्ये तब्बल सव्वा कोटी रुपयांचा घोटाळा — शेकडो गावकऱ्यांची फसवणूक.



Nagpur post Bank Ghotala : नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील दिग्रज ब्रांच पोस्ट ऑफिसमध्ये तब्बल सव्वा कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या ब्रांच पोस्ट ऑफिसशी जोडलेल्या दिग्रज, सहली, येरळा, धोटे, हरमखोरी या गावांमधील शेकडो कुटुंबांच्या बचत खात्यांमध्ये, आरडी आणि एफडी खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.

गावकऱ्यांनी मेहनतीने, मोलमजुरी करून जमवलेले पैसे विश्वासाने या पोस्ट ऑफिसमध्ये जमा केले होते. मात्र, 2022 पासून कार्यरत असलेल्या महिला पोस्ट मास्टर सिंधुबाई बाळबुधे यांनी या खात्यांमधून सव्वा कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

गावकऱ्यांची हाक — "घाम गाळून कमावलेले पैसे उडाले!"

या प्रकरणामुळे अनेक गावकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. एका महिला खातेदाराने सांगितले,

“माझे तीन लाख रुपये फिक्स होते. एक लाखवी हजार चालू रोडिंगमध्ये होते आणि आरडी दरमहा 300 रुपये होती. आता पासबुकात दाखवतायत की पैसेच नाहीत. पोस्ट ऑफिसकडून फोन येतो, पण मला फक्त बाराशे रुपये दाखवतायत!”

तर दुसरी महिला म्हणाली,

“माझ्या मुलीच्या लग्नासाठी मी 50 हजार रुपये जमा केले होते. मी गट उचलून तिच्या हातात पैसे दिले, पण ती म्हणते मी दिलेच नाही. आमचे सगळे पैसे हडप झालेत.”

घोटाळ्याची पद्धत — सही घेऊन पैसे काढले, पासबुक न दिले

गावकऱ्यांच्या मते, या पोस्ट ऑफिसमध्ये डिपॉझिट पावतीऐवजी विड्रॉल पावतीवर सही घेऊन पैसे काढण्यात आले. काही प्रकरणांमध्ये तर सहीही घेतली नाही आणि पैसे काढले गेले.

आरडी खात्यांमध्ये जवळपास 100 ते 150 खात्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. गावकऱ्यांकडून पैसे घेतले जात होते, पण ते पासबुक किंवा लेजरमध्ये नोंदवले जात नव्हते. त्यामुळे लोकांना आपल्या खात्यातील रक्कम माहित नसून, पासबुक एंट्रीही महिनोन्‌महिने प्रलंबित राहिल्या.

बनावट पासबुक आणि खोटी एंट्री

अनेक एफडी खातेधारकांना बनावट पासबुक दिले गेले, त्यामध्ये खोट्या एंट्री दाखवण्यात आल्या. काहींना तर पासबुकच परत देण्यात आले नाही. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार,

“आरडी खात्यात पैसे भरले तरी पावत्या दिल्या जात नव्हत्या. पासबुक देत नव्हत्या, म्हणायच्या ‘उद्यापासून मिळेल’... पण महिने गेले, पैसे नाही मिळाले.”

गावकऱ्यांचा रोष – “सरकारने आमचा पैसा परत द्यावा”

या घोटाळ्यामुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण आहे. गावकऱ्यांनी पोस्ट विभागाने तत्काळ कारवाई करून सर्वांची पैसे परत करावीत, अशी मागणी केली आहे.
पोस्ट विभागाकडून या प्रकरणात आतापर्यंत अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

दिग्रज ब्रांच पोस्ट ऑफिसमधील या प्रकरणामुळे ग्रामीण भागातील पोस्ट बँकिंग व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. मेहनतीने साठवलेले गावकऱ्यांचे पैसे अशा प्रकारे हडप होणं ही गंभीर आर्थिक फसवणूक आहे. या घोटाळ्याचा संपूर्ण तपास करून दोषींवर कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या