डिजिटल गावकरी न्यूज
Goregaon Gondia : गोरेगाव शहरातील दुर्गा चौक परिसरात दुपारी घडलेल्या दिवसाढवळ्या चोरीच्या घटनेने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. पुरोहित मिठाई दुकानासमोर रोडवरून जात असताना 49 हजार रुपयांनी भरलेली पिशवी दोन अज्ञात इसमांनी मोटरसायकलवरून हिसकावल्याची घटना उघडकीस आली असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
फिर्यादी धनलाल बोपचे यांनी 14 नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे 1 वाजता को-ऑपरेटिव्ह बँकेतून आपल्या खात्यातील 49,000 रुपये काढले. त्यांनी ते रुपये स्वतःच्या पिशवीत ठेवले आणि बसस्टॉपजवळील स्टुडिओमध्ये पासफोटो काढण्यासाठी गेले. फोटो काढून पिशवी हातात घेत ते पायीपायी दुर्गा चौकाच्या दिशेने परत येत असताना पुरोहित मिठाई दुकानासमोर ही घटना घडली.
फिर्यादी समोरून मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांपैकी मागे बसलेल्या इसमाने क्षणात पिशवी हिसकावली आणि दोघेही वेगाने पसार झाले. घटनेनंतर धावपळ उडाली असून तत्कालीन सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींची मोटरसायकल व हालचाली स्पष्ट दिसत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
चोरीची माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात असून लवकरच चोरट्यांना ताब्यात घेण्यात येईल, असा विश्वास स्थानिक पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या दिवसाढवळ्या चोरीच्या प्रकारानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बाजारपेठ परिसरात पोलिस गस्त वाढविण्यात आली आहे.

0 टिप्पण्या