डिजिटल गावकरी न्यूज
Gondiya News : डागुर्ली परिसरात 20 दिवसांच्या निरागस नवजात बाळाच्या खुनाची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात बालकाच्या अपहरणाची खोटी तक्रार दाखल करून स्वतःच बाळाचा खून केल्याचा धक्कादायक खुलासा झाला असून आरोपी आईला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मात्र 24 तासांत अटक केली आहे.
खोटी तक्रार, चौकशीत उघडकीस आली सत्यस्थिती
ही घटना उघडकीस आणताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली होती. फिर्यादी महिलेची तक्रार संशयास्पद असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. त्यानंतर साक्षीदारांची चौकशी, घटनास्थळाचा तपास आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपी आईवर लक्ष केंद्रीत केले.
सखोल चौकशीत आरोपी आई रिया राजेंद्रसिंह फाये (वय-26) हिने अखेर आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
“बाळ नको होते… नोकरी करायची होती” – आरोपीचे कबुलीजबाबात विधान
चौकशीदरम्यान आरोपी आईने सांगितले की तिला हे मूल नको होते. ती नोकरी करू इच्छित होती, पण पतीने गर्भपात करण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे अनिच्छेने गर्भ राहिला आणि बाळ जन्मले. बाळामुळे घरात अडकून राहावे लागेल, बाहेर नोकरीसाठी जाता येणार नाही, या तणावातून तिने अत्यंत अमानवी पाऊल उचलल्याचे कबूल केले.
त्यानंतर तिने बाळाला घरातून बाहेर नेले आणि त्याचा घातपात करून प्राणघातक कृत्य घडवून आणले. त्यानंतर पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी अपहरणाची खोटी तक्रार दाखल केली.
पोलिसांची जलद कारवाई; आरोपीला अटक
गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने तपासाची गती वाढवली आणि आरोपी आईला ताब्यात घेऊन 24 तासांच्या आत प्रकरणाचा छडा लावला. आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
या घटनेने डागुर्ली तसेच संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नवजात बाळाच्या निर्दयी हत्येमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे.

0 टिप्पण्या