शेतकऱ्याची जिद्द! दोन एकर शेतीतून थेट KBC मध्ये 50 लाख जिंकले – कैलास कुंटेवाड यांची प्रेरणादायी यशकथा.


Digital Gavkari news
Durgaprasad Gharatkar

नमस्कार मित्रांनो, मी दुर्गाप्रसाद घरतकर, डिजिटल गावकरी या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करतो. आज आपण बोलणार आहोत पैठण तालुक्यातील गावथांडा येथील एका जिद्दी शेतकऱ्याची प्रेरणादायी कथा कैलास कुंटेवाड यांची, ज्यांनी “कौन बनेगा करोडपती (KBC)” या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये 50 लाख रुपयांचे पारितोषिक जिंकून संपूर्ण मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रात प्रेरणेचा दीप पेटवला आहे.

दोन एकर शेती आणि मोठं स्वप्न

कैलास कुंटेवाड यांच्याकडे केवळ दोन एकर शेती आहे. याच दोन एकर शेतीवर ते आपला संसार चालवत होते. चार एकर शेती त्यांनी बटाईवर घेतली होती. शेतीत तूर आणि कापूस या पिकांचे मिश्रण घेतले जाते, तर बटाईवरच्या जमिनीवर डाळिंबाची लागवड त्यांनी केली आहे. परंतु हवामानातील अनिश्चितता, अतिवृष्टी, आणि पिकांची हानी यामुळे उत्पन्न अत्यंत मर्यादित होतं.

कैलास कुंटेवाड यांच्या अभ्यास आणि जिद्द

दिवसातून शेती आणि मजुरी करत करतही कैलास यांनी आपला अभ्यास कधीच सोडला नाही. त्यांनी मोबाईल आणि यूट्यूबचा योग्य वापर करून जनरल नॉलेजचा अभ्यास सुरू ठेवला. ते सांगतात काम कितीही असलं तरी रोज किमान एक तास मी अभ्यासासाठी देत होतो. पाऊस असल्यास किंवा काम नसल्यास तीन-चार तास मी YouTube वरून शिकत होतो. हाच माझ्या यशाचा पाया ठरला.”

कैलास कुंटेवाड यांचा KBC पर्यंतचा प्रवास

तीन-चार वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर अखेर त्यांना KBC मध्ये निवड मिळाली. तिथे त्यांनी एकामागोमाग एक प्रश्नांची उत्तरे शांत मनाने दिली.

“अमिताभ बच्चन सरांसमोर बसल्यावर दडपण येतं, पण मी मन शांत ठेवलं. मला जे माहीत होतं त्यावर विश्वास ठेवला. कोटीचं उत्तर माहीत नव्हतं म्हणून रिस्क घेतली नाही.”

अशा प्रकारे त्यांनी सुरक्षितपणे 50 लाख रुपयांची रक्कम जिंकली आणि आपलं स्वप्न साकार केलं.

अमिताभ बच्चन यांचं प्रोत्साहन

कैलास म्हणतात “अमिताभ बच्चन सर फक्त प्रश्न विचारत नाहीत, तर प्रत्येक स्पर्धकाचं मनोबल वाढवतात. ते कितीही निराश माणसाला पुन्हा उभं करू शकतात. त्यांचं प्रोत्साहन हे माझ्यासाठी आजीवन प्रेरणादायी ठरणार आहे.”

कैलास कुंटेवाड यांच्या कुटुंबाचं योगदान

कैलास यांच्या यशामागे त्यांच्या पत्नीचा आणि कुटुंबाचा मोठा वाटा आहे. ते म्हणतात “माझी पत्नी माझी खरी बॅकबोन आहे. आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडूनही मला प्रेरणा मिळाली.”

कैलास कुंटेवाड यांच्या 50 लाखांचं नियोजन

कैलास कुंटेवाड यांनी सांगितलं की, ही रक्कम योग्य नियोजन करून वापरण्याचा त्यांचा मानस आहे.
“पहिलं प्राधान्य माझ्या मुलांच्या शिक्षणाला देणार आहे. दोन्ही मुलं क्रिकेटकडे आकर्षित आहेत. त्यामुळे त्यांना योग्य प्रशिक्षण आणि शिक्षण देण्यासाठी ही रक्कम वापरणार आहे.”

त्यांची दोन्ही मुलं सध्या औरंगाबादमधील सरस्वती भवन स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत आणि क्रिकेट अकॅडमीत प्रशिक्षण घेत आहेत.

क्रिकेटचा छंद आणि प्रेरणा

कैलास यांचा क्रिकेटवरील प्रेम हे सर्वश्रुत आहे. 50 लाख रुपयांच्या प्रश्नाचे उत्तरही क्रिकेटशी संबंधित होतं.

“प्रश्न होता — एकदिवसीय सामन्यात पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा खेळाडू कोण? आणि उत्तर होतं — सज्जन रमेश. हा माझ्या बालपणातल्या क्रिकेट क्षणांशी जोडलेला प्रश्न होता, त्यामुळे लगेच उत्तर दिलं.”

शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण

कैलास कुंटेवाड यांनी सिद्ध केलं की जमिनीची मर्यादा माणसाच्या स्वप्नांना अडवू शकत नाही. दोन एकर शेती, मर्यादित साधनं, आणि अपार जिद्द यांच्या जोरावर त्यांनी देशभरात आपलं नाव कमावलं.

त्यांचं हे यश सांगतं “परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि सातत्य ठेवलं तर यश नक्की मिळतं.”

कैलास कुंटेवाड यांची ही कहाणी ही फक्त एका शेतकऱ्याची गोष्ट नाही, तर मराठवाड्यातील प्रत्येक कष्टकरी शेतकऱ्याची प्रेरणा आहे. मर्यादित साधनांतून, ज्ञान आणि प्रयत्नांच्या बळावरही आयुष्य कसं बदलता येतं याचं हे जिवंत उदाहरण आहे. त्यांच्यासारख्या शेतकऱ्यांनी दाखवून दिलं आहे की “शेतकऱ्याची जिद्दच खरी श्रीमंती आहे.”




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या