डिजिटल गावकरी न्यूज
बीड (प्रतिनिधी)
नमस्कार मंडळी बीड जिल्ह्यात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे काही भागात ढगफुटीचा प्रसंग घडला. या अचानक झालेल्या पावसामुळे शेतं पाण्याखाली गेली, घरे व रस्ते जलमय झाले आणि काही ठिकाणी जीवितहानीही झाली आहे. पिंपळवाडी गावात दहा वर्षांचा चिमुकला पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पिंपळवाडी येथील आदित्य कळसानी हा चौथी इयत्तेत शिकणारा दहा वर्षांचा मुलगा रविवारी सकाळी शेताच्या दिशेने गेला होता. दरम्यान, अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला आणि शेतात साचलेल्या पाण्यात पाय घसरून तो पडला. पाण्याचा जोर इतका होता की आदित्य वाहून गेला आणि त्याचा शोध सुरू झाला. स्थानिक ग्रामस्थ, पोलिस आणि प्रशासनाने तत्काळ शोधमोहीम सुरू केली.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
या घटनेमुळे कळसानी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आदित्यच्या वडिलांनी सांगितले, “तो शेतात गेला आणि पाय घसरून पडला, आम्ही काही समजायच्या आतच सर्व काही संपलं.” त्यांच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. आई आणि आजी देखील शोकाकुल अवस्थेत आहेत. त्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली असून, “आता जे झालं ते परत येणार नाही, पण आम्हाला थोडी मदत मिळाली पाहिजे” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
कळसानी कुटुंब ऊसतोड कामगार असून, त्यांचा संसार शेतमजुरीवर चालतो. त्यांच्या संसाराचा आधार असलेला मुलगा गमावल्याने त्यांचं जगणं कोसळलं आहे. “आम्ही गरीब आहोत, ऊसतोड करून घर चालवतो, सरकारने आमच्या या दुःखाची दखल घ्यावी,” असे ते म्हणाले.
प्रशासनाकडून मदतीचे आश्वासन
या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तात्काळ पथक रवाना केले असून, मृतकाच्या कुटुंबाला शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे तहसीलदारांनी सांगितले आहे. तसेच बीड जिल्ह्यातील ढगफुटीग्रस्त भागांमध्ये मदतकार्य सुरू असून, नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत.
बीड जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाने हाहाकार माजवला आहे. काही ठिकाणी शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, रस्ते वाहून गेले आहेत. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि नदी-नाल्यांच्या आसपास जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
दहा वर्षांच्या आदित्यच्या मृत्यूने पिंपळवाडी गाव शोकसागरात बुडालं आहे. निसर्गाच्या रौद्ररूपासमोर माणूस असहाय असल्याचं हे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. प्रशासनाने अशा घटना टाळण्यासाठी योग्य पावसाळी उपाययोजना करणे आणि गरीब कुटुंबांना तातडीने मदत करणे हीच काळाची गरज आहे.

0 टिप्पण्या