अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा; भरपाई आजपासून खात्यात.

राज्यातील ३३ जिल्ह्यांतील ५२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान — भरपाई दोन टप्प्यात वितरित होणार

नागपूर: दिवाळी व धनतेरसच्या मुहूर्तावर राज्य सरकारकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील तब्बल ३३ जिल्ह्यांतील ५२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना भरपाई वितरणाची प्रक्रिया १८ ऑक्टोबरपासून (शनिवार) सुरू होत आहे. त्यामुळे सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

कृषी विभागाकडून सर्व जिल्ह्यांचे पंचनामे तयार करून सरकारकडे सादर करण्यात आले आहेत. सरकारने या अहवालांच्या आधारे नुकसानभरपाईची मंजुरी दिली असून निधी वितरणाची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. भरपाईचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत.

दोन टप्प्यात होणार भरपाई वितरण

भरपाई वितरणाची प्रक्रिया दोन टप्प्यात केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना पैसे मिळतील. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित जिल्ह्यांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील.

३३ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना लाभ

या योजनेअंतर्गत कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील एकूण ३३ जिल्ह्यांतील शेतकरी पात्र ठरणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातही अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असून हजारो शेतकऱ्यांना भरपाईचा लाभ मिळणार आहे.

शेतकऱ्यांना सूचना

शेतकऱ्यांनी आपली बँक खाती अद्ययावत ठेवावीत.

कृषी विभागाकडून केलेल्या पंचनाम्यात आपले नाव आहे का ते तपासावे.

भरपाईबाबत काही तक्रार असल्यास तात्काळ तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याने त्यांचा आर्थिक ताण काही प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा आहे. राज्य सरकारने जलद गतीने भरपाई वाटप करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या