नागपूर | प्रतिनिधी
दुर्गाप्रसाद घरतकर
Nagpur 200 Fake voter List : नमस्कार मंडळी राज्यात आगामी काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. अशात नागपूरच्या हिंगणा विधानसभा मतदारसंघातील वाना डोंगरी येथे मतदार यादीत मोठा घोळ झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते दिनेश बंग यांनी केला आहे.
बंग यांनी आरोप केला की, वाना डोंगरी नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक पाचमधील घर क्रमांक एक मध्ये तब्बल 200 मतदारांची नोंद करण्यात आली आहे, जे अत्यंत संशयास्पद आहे. “एका घरात 200 मतदार राहतात कसे?” असा सवाल उपस्थित करत बंग यांनी निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
घरमालकाचा खुलासा
झी 24 तासच्या प्रतिनिधींनी संबंधित घराला भेट दिली असता, त्या घरातील रहिवासी अरविंद बावनथळे यांनी सांगितले की त्यांच्या घरामध्ये फक्त सातच मतदार आहेत. तसेच त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही केली आहे. बावनथळे म्हणाले, “आमच्या घरात सातच लोक राहतात. मतदार यादीत 200 नावे नोंद झाली असतील तर ती चूक आहे. प्रशासनाने चौकशी करावी.”
प्रशासनाचे स्पष्टीकरण
या आरोपांवर प्रतिक्रिया देताना वाना डोंगरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल परिहार यांनी म्हटलं की, घर क्रमांक म्हणजेच मालमत्ता क्रमांक नसतो. अनेकदा नागरिकांकडे घर क्रमांक नसल्यास फॉर्म भरताना “0” किंवा “1” असे क्रमांक देण्यात येतात. त्यामुळे एकाच घरात 200 मतदार असल्याचा गैरसमज झाला आहे.
परिहार यांनी स्पष्ट केले की, “झिरो आणि एक हे केवळ तात्पुरते क्रमांक असतात. त्यामुळे एकाच क्रमांकावर नावे दिसतात, पण प्रत्यक्षात हे वेगवेगळ्या ठिकाणचे मतदार असतात. प्रत्येकाची स्वतंत्र तपासणी केली जाते आणि त्यानंतरच मतदार पात्र किंवा अपात्र ठरवले जातात.”
राजकीय आरोप-प्रत्यारोप
या प्रकरणावर भाजप आमदार समीर मेघे यांनी राष्ट्रवादी नेते दिनेश बंग यांचे आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले, “विकासाच्या मुद्द्यावर बोलायला काहीच नसल्यामुळे विरोधक अशा प्रकारचे निराधार आरोप करत आहेत. काही वेळा संगणक ऑपरेटरकडून टायपिंग मिस्टेक होऊ शकते, पण हे कोणतेही मोठे घोटाळे नाहीत.”
मतदार यादीतील गोंधळाचा मुद्दा नवीन नाही. यापूर्वीही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदार यादीतील त्रुटींविषयी अनेकदा प्रश्न उपस्थित केले होते. आता राष्ट्रवादी शरद पवार गटानेही हाच मुद्दा पुढे केला आहे.
प्रशासनाने सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याचे सांगितले आहे. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद निवडणुकीत नवा राजकीय मुद्दा ठरू शकतो, हे निश्चित आहे.

0 टिप्पण्या