गोंदियाचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी तबेतीचं कारण देत राजीनामा दिला, इंद्रनील नाईक यांच्याकडे नवी जबाबदारी.


डिजिटल गावकरी न्यूज
दुर्गाप्रसाद घरतकर

गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी तबेतीचं कारण देत आपल्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या ऐवजी आता इंद्रनील नाईक यांच्याकडे गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या निर्णयामुळे गोंदिया जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाबासाहेब पाटील यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन काही दिवसांपूर्वी झालं होतं. त्यामुळे त्यांना लांबचा प्रवास करणं अवघड होतं. याच कारणामुळे त्यांनी तबेतीचं कारण देत आपलं पालकमंत्री पद सोडल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार या निर्णयामागे फक्त तबेतीचं कारण नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेदही कारणीभूत असावेत, असा अंदाज वर्तवला जातोय.

नुकताच नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा मेळावा पार पडला होता. या मेळाव्यात बाबासाहेब पाटील यांनी प्रफुल पटेल यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांनी भाषणादरम्यान म्हटलं होतं की, “विदर्भातील पालकमंत्री जिल्ह्यांत क्वचितच येतात. केवळ सहलीसाठी किंवा राष्ट्रीय सणांच्या दिवशीच दिसतात.” या वक्तव्यामुळे पक्षाच्या आत तणाव निर्माण झाल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी वरळी येथे जिल्हाध्यक्षांची बैठक झाली. या बैठकीतच बाबासाहेब पाटील यांनी गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची घोषणा करण्यात आली. यानंतर राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे गोंदिया जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

इंद्रनील नाईक हे विदर्भातील तरुण आणि ऊर्जावान नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचं विदर्भाशी जवळचं नातं असल्यामुळे गोंदिया जिल्ह्याचं पालकमंत्रिपद त्यांच्याकडे देण्यात आलं आहे. त्यामुळे गोंदियात नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पूर्वीपासूनच बाबासाहेब पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी आपल्या स्वतःच्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मागितलं होतं. मात्र, त्यांना दूरच्या जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्यात नाराजीचा सूर कायम असल्याचं बोललं जातंय. काही दिवसांपूर्वी हसन मुश्रीफ यांनीही विदर्भातील एका जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सोडलं होतं, आणि आता बाबासाहेब पाटील यांनी देखील पदाचा राजीनामा दिला आहे.

बाबासाहेब पाटील हे सहकार मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील मराठा नेते म्हणून ओळखले जातात. तबेतीचं कारण दिलं असलं, तरी नागपूरमधील भाषणात त्यांनी प्रफुल पटेल यांच्यावर केलेल्या टीकेची किनार या निर्णयामागे असू शकते, असा राजकीय अंदाज व्यक्त केला जातोय.

या घडामोडींनंतर गोंदिया जिल्ह्याचे नवे पालकमंत्री म्हणून इंद्रनील नाईक यांच्यावर आता मोठी जबाबदारी आली आहे. ते विदर्भातील असल्यामुळे गोंदियाशी त्यांचा संपर्क सुलभ राहणार असून, स्थानिक स्तरावर त्यांची उपस्थिती वाढण्याची शक्यता आहे.

गोंदियात पालकमंत्री बदलल्यामुळे स्थानिक राजकारणात नवीन समीकरणं तयार होण्याची चिन्हं दिसत आहेत. बाबासाहेब पाटील यांनी तबेतीचं कारण देऊन पद सोडलं असलं, तरी हा निर्णय केवळ तबेतीपुरता नसून राजकीय संकेत देणारा आहे, असा सूर राजकीय वर्तुळात उमटतोय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या