डिजिटल गावकरी न्यूज
दुर्गाप्रसाद घरतकर
देवरी, 28 सप्टेंबर 2025: गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील पळसगाव ग्रामपंचायतीअंतर्गत धम्मदिटोला गावात रात्रीच्या वेळी वाघाच्या हल्ल्यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना रविवार, 28 सप्टेंबर 2025 च्या रात्री अंदाजे 1 वाजण्याच्या सुमारास घडली. मृत महिलेचे नाव प्रभाई शंकर कोराम (वय 49, रा. आलेवाडा, देवरी) असे आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाई कोराम या गेल्या एक महिन्यापासून आपल्या मुलीच्या बाळंतपणाकरिता धम्मदिटोला येथे पाहुणी म्हणून आल्या होत्या. रात्री जेवणानंतर कुटुंबातील सर्वजण झोपी गेले असताना, प्रभाई खाटेवर झोपल्या होत्या. याच वेळी वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला करून त्यांना फरफटत जवळच्या वाळीत नेले आणि ठार केले. सकाळी घरातील सदस्यांना याची माहिती मिळताच गावात एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी आरडाओरड करत घटनास्थळी गर्दी केली आणि वन विभाग तसेच पोलिसांना माहिती देण्यात आली.
वन विभागावर संताप
माहिती मिळताच वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मात्र, अशा घटना सातत्याने घडत असूनही वन विभाग कोणत्याही ठोस उपाययोजना करत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये अनेकांनी जीव गमावला आहे. यापूर्वी अर्जुनी मोर तालुक्यातील संजय नगरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर धम्मदिटोला येथील घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावकऱ्यांची मदतीची मागणी
स्थानिकांनी वन विभागाकडून तातडीने उपाययोजना करण्याची आणि मृतकाच्या कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. गावकऱ्यांमध्ये वन विभागाच्या निष्क्रियतेबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांचे वाढते प्रमाण
गोंदिया जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. वन विभागाने यावर तात्काळ आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

0 टिप्पण्या