गोंडखैरी कोळसाखाण : अदानी पावरला परवानगी आणि 104 गावांचा विरोध.

 नागपूर जिल्ह्यातील गोंडखैरी कोळसाखाण अदानी पावर समूहाला देण्यात आली आहे. 122 कोटींच्या करारानंतर 104 गावांचा विरोध, शेतकऱ्यांची भीती आणि पर्यावरणीय धोके जाणून घ्या.








प्रस्तावना


नमस्कार मित्रांनो, नमस्कार मंडळी! विदर्भाची माती ही कष्टकऱ्यांच्या घामाने भिजलेली, शेतकऱ्यांच्या मेहनतीने उभी राहिलेली आणि पर्यावरणाशी एकरूप झालेली आहे. परंतु आता या मातीतूनच प्रश्न उभा राहतोय – "जमिनीचं पोट फाडून केलेला विकास काय कामाचा?". हा प्रश्न सध्या दशावतार सिनेमात ठणकतोय आणि त्याचबरोबर वास्तवातही विदर्भातील शेतकरी आणि ग्रामस्थ विचारत आहेत. कारण नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरी कोळसाखाण अदानी पावर समूहाला प्रदान करण्यात आली आहे.


या खाणीच्या कामकाजाला सुरुवात करण्यासाठी केंद्रीय कोळसा मंत्रालयाने परवानगी दिली आहे. तब्बल 122 कोटींच्या करारानंतर ही खाण अदानी समूहाला मिळाली आहे. पण या निर्णयाविरोधात नागपूर जिल्ह्यातील 104 गावातील ग्रामस्थ जोरदार आवाज उठवत आहेत. शेतकऱ्यांना भीती आहे की या खाणीमुळे शेतीचं नुकसान, पाणीटंचाई, पर्यावरणीय प्रदूषण आणि जैवविविधतेचा ऱ्हास होणार आहे.


या लेखातून आपण जाणून घेणार आहोत – गोंडखैरी कोळसाखाणीचं स्वरूप, ग्रामस्थांचा विरोध का आहे, पर्यावरणीय परिणाम काय होऊ शकतात आणि अदानी समूहासाठी ही खाण किती महत्त्वाची आहे.


गोंडखैरी कोळसाखाण अदानी समूहाला कशी मिळाली?


2023 मध्ये केंद्रीय कोळसा मंत्रालयाने देशातील 92 कोळसा खाणींचा लिलाव केला होता. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक खाणींचा समावेश होता – दहेगाव झुणकी, दहेगाव सप्तधारा, हिंगणा बाजारगाव इत्यादी. याच प्रक्रियेतून गोंडखैरी कोळसाखाण अदानी पावर समूहाला देण्यात आली. 23 जुलै 2023 रोजी यासंदर्भात जनसुनावणी पार पडली होती. त्यावेळीच 24 मुख्य गावांसह 80 छोट्या गावांनी विरोध नोंदवला होता.


मात्र, ग्रामस्थांचा ठराव, पर्यावरणवाद्यांचा आवाज आणि विरोधाच्या पत्रांवर दुर्लक्ष करत अखेर 2025 मध्ये केंद्रीय कोळसा मंत्रालयाने अदानी पावर समूहाला परवानगी दिली.


ग्रामस्थांचा विरोध का?


ग्रामस्थांचा विरोध तीन प्रमुख मुद्द्यांवर आधारित आहे:


1. पर्यावरणीय धोका


गोंडखैरी परिसर आधीच प्रदूषणाने त्रस्त आहे. कोराडी थर्मल पावर स्टेशनमुळे हवेचं प्रदूषण वाढलं आहे. नवीन खाण सुरू झाल्यास हवा आणि जमिनीवर गंभीर परिणाम होईल, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.


2. पाण्याचं संकट


ही खाण सुरू झाली तर भुयारी पाणी स्रोत दूषित होण्याची शक्यता आहे. विदर्भ आधीच दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पाण्याची टंचाई अधिक तीव्र होईल आणि शेती संकटात येईल.


3. शेतीचं नुकसान


गोंडखैरी परिसरात लिंबूवर्गीय फळबागा मोठ्या प्रमाणावर आहेत. आधीच पाण्याचा अभाव आहे, त्यात खाणीच्या कामामुळे बागा नष्ट होण्याचा धोका आहे. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं.


विदर्भातील शेतकरी आत्महत्या आणि खाणीचा संबंध


2023 च्या अहवालानुसार महाराष्ट्रात 10 महिन्यांत 2366 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी 257 आत्महत्या गोंडखैरी परिसरात झाल्या होत्या. दुष्काळ, पिकांचं नुकसान आणि कर्जबाजारीपणा हे प्रमुख कारणं मानले जातात. ग्रामस्थांचं म्हणणं आहे की खाणीमुळे परिस्थिती आणखी बिकट होईल आणि आत्महत्या वाढू शकतात.


जैवविविधतेवर परिणाम


गोंडखैरी खाणीपासून अवघ्या 30 किमी परिसरात दोन मोठे व्याघ्र प्रकल्प आहेत:


बोर व्याघ्र प्रकल्प (21 किमी अंतरावर)


पेंच व्याघ्र प्रकल्प (31 किमी अंतरावर)


या प्रकल्पांच्या इतक्या जवळ खाण सुरू झाल्यास वाघांच्या वावरावर परिणाम होऊ शकतो. आवाज, प्रदूषण आणि जंगलातील हालचाल यामुळे वन्यजीवांना धोका निर्माण होईल.


ग्रामस्थांचे आरोप


ग्रामस्थांचं म्हणणं आहे की या प्रकल्पाला मंजुरी देताना घाईघाईने निर्णय घेतले गेले. त्यावेळचे वनसंरक्षक अधिकारी यांनी योग्य अभ्यास न करता मंजुरी दिली. तसेच "झाडं तोडली जाणार नाहीत" अशी खात्री दिली होती. पण भविष्यात झाडं तोडली जाण्याची शक्यता ग्रामस्थ मांडत आहेत.


अदानी समूहासाठी गोंडखैरी खाणीचं महत्त्व


महाराष्ट्रात अदानी समूहाची ही पहिली कोळसाखाण आहे. नागपूरपासून अवघ्या 20 किमी अंतरावर असलेली ही खाण विदर्भासाठी रणनीतिक दृष्ट्या महत्त्वाची आहे. त्यामुळे अदानी पावर समूह विदर्भात आपला पाय रोवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत.


गोंडखैरी कोळसाखाण प्रकल्प हा केवळ अदानी पावर समूहासाठी एक व्यावसायिक संधी नाही, तर तो विदर्भातील 104 गावांच्या अस्तित्वाशी निगडित प्रश्न आहे. ग्रामस्थांचा विरोध हा फक्त भावनिक नाही, तर पर्यावरण, पाणी आणि शेतीवर आधारित वास्तवाशी जोडलेला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या